मुंबई Sanjay Raut Jail in Defamation Case : भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमैया यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्याची माहिती मेधा सोमैया यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी दिली. न्यायालयानं संजय राऊत यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत 25 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांना जामीन मंजूर : संजय राऊत यांनी या प्रकरणी जामीनासाठी त्याच न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यानंतर लगेच सुनावणी होत राऊत यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. तसंच झालेल्या शिक्षेविरोधात संजय राऊत हे मुंबई सत्र न्यायालयात जाणार आहेत.
तुम्ही मला कितीही शिक्षा देऊ शकता, मला काही अडचण नाही. तुम्ही न्यायालयाचा आदेश वाचा, मी काही चुकीचं बोललो आहे, असं न्यायालयानं म्हटलं नाही. ही संपूर्ण न्याय व्यवस्था 'सांघी' झाली. आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी लाडू खाण्यासाठी जातात. हे संपूर्ण देश पाहत आहे. आमच्यासारख्या लढणाऱ्यांना न्याय कुठे मिळणार? : संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं? : कोविड काळात झालेल्या शौचालय घोटाळ्यामध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया आणि त्यांच्या पत्नीचा सहभाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर डॉ. मेधा सोमैया यांनी संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणी आज (26 सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी मेधा सोमैया यांच्या वकिलांनी संजय राऊत यांनी सोमैया यांच्याविरोधात केलेले सर्व आरोप खोटे असून बिनबुडाचे आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याची बाजू न्यायालयासमोर मांडली. तसंच आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात राऊतांना अपयश आलं. त्यामुळं त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध झाल्यानं राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. माझगाव येथील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्या न्यायालयानं हा दंड आणि शिक्षा ठोठावली.
नेमकं काय आहे प्रकरण? : मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहेत. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमैया यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. मात्र, बनावट कागदपत्रं सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा तसंच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलंही घेतल्याचा आरोप सोमैयांवर करण्यात आला. त्यानंतर शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचं म्हटलं होतं. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ही विधानं करण्यात आली आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा -