मुंबई Sanjay Raut News - खासदार संजय राऊत यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून महायुती सरकावर निशाणा साधला. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या भडकाऊ विधानावरून पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपावर हल्लाबोल केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून पुतळ्याची विटंबना- खासदार संजय राऊत म्हणाले, "मुंबई विमानतळ हे उद्योगपती अदानी यांच्या ताब्यात गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आता तेथे जागा नाही. शिवरायांच्या पुतळ्याची अशी विटंबना भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून होत असेल तर ती अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भारतीय जनता पक्षाचा असल्याचा आहे. " मालवणच्या पुतळ्या संदर्भात सध्या मुख्य आरोपी शिल्पकार याला अटक झाली नाही. तो फरार असून वर्षा बंगल्यावर तर लपून राहिला नाही ना, अशी शंकाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
CSMIA मुंबई येथे सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे योग्य आणि पूर्ण संरक्षण करण्यासाठी पुतळा तात्पुरता झाकण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेले विमानतळ म्हणून अभिमानाने आम्ही ही खबरदारी आणि काळजी घेतली. राजकीय लाभासाठी काही मंडळी करत असलेल्या आरोपांना सत्यता नाही. या प्रतिष्ठित पुतळ्याची अखंडता जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई
अजित पवार यांच्यावर हल्लाबोल- "फोटोला जोडे का मारतात? त्यापेक्षा समोरासमोर या.. असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीला केलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ज्यांनी स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाह यांच्या ताकदीचा वापर करून काकांचा पक्ष व चिन्ह पळून नेलं, त्यांनी अशी भाषा करणं योग्य नाही. स्वतःमध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा. निवडणूक लढवाव्यात. चोऱ्यामाऱ्या करून राजकारण करणाऱ्या शिंदे आणि अजित पवार यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही," असंही राऊत म्हणाले.
नितेश राणेंवर काय कारवाई केली?संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार नितेश राणे आणि त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांच्यावरही कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. राऊत म्हणाले," भाजपाचा आमदार आणि त्याचे वडील अगोदर शिवसेनेमध्ये होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपामध्ये असून स्वतःला हिंदुत्ववादी बोलतात. आमदार पुत्र म्हणतो प्रार्थनास्थळामध्ये घुसून मारेन. नरेंद्र मोदी यांना माझं आव्हान आहे की, अशा प्रकारची भाषा त्यांना मंजूर आहे का? जर अशी भाषा त्यांना मंजूर असेल तर त्यांनी विदेशात दुबई, सौदी अरेबिया येथील प्रार्थनास्थळात जाऊन एकतेचं पाठ सांगणं सोडून द्यावे. अशा पद्धतीची भाषा जर कोणी करत असेल तर सरकारनं त्या आमदारावर काय कारवाई केली? हेच लोक राज्यात अशा पद्धतीची भाषा वापरून दंगल घडवू पाहत आहेत," गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला.
- मालवण पाठोपाठ मुंबईमधील शिवरायांच्या पुतळ्याचे हे दुसरे प्रकरण समोर आल्यानं महायुती सरकारच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा-