मुंबई : "राज ठाकरे यांच्याकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट आहे. ईडीची टांगती तलवार असल्यानं त्यांना बोलावं लागते," असा जोरदार हल्लाबोल उबाठा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केला. "विधानसभा निवडणूक 2024 मध्ये गुंडांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गुंड पोलिसांना आदेश देत आहेत. मात्र सरकार बदलणार हे पोलिसांनी लक्षात ठेवावं," असा दमही खासदार संजय राऊत यांनी पोलिसांना भरला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
राज ठाकरेंवर ईडीची टांगती तलवार : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले, की "राज ठाकरे यांची स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली आहे. त्याचप्रमाणं राज ठाकरे यांच्यावर ईडीची टांगती तलवार असल्यानं त्यांना हे सर्व बोलावं लागत आहे," असा आरोपही संजय राऊत यांनी केला. "भाजपाच्या नादी लागलेला अजून काय बोलणार? राज ठाकरे जिथं बोलले तिथं गुंडांच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे, असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला आहे. "गुंडांच्या मदतीनं सत्ताधारी पक्षाचे नेते निवडणुका लढवत असून प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र गुंडांची नियुक्ती त्यांनी केली आहे. ज्या पद्धतीनं शिंदे आणि भाजपाचे लोक गुंडांचा वापर करुन निवडणुका लढवत आहेत, त्यानंतर जे घडेल त्याची सर्व जबाबदारी पोलिसांची असेल."
पंतप्रधान मोदी - अमित शाहांमुळे आम्ही अनसेफ : "एक रहेंगे तो सेफ रहेंगे" या पंतप्रधान मोदी यांच्या नाऱ्यावर सुद्धा संजय राऊत यांनी टीका केली आहे. "अशा प्रकारची भाषा बोलण्याची वेळ पंतप्रधानांवर का यावी? आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्कीच सेफ असून मोदी - शाह आल्यानंतरच आम्ही अनसेफ होतो," अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. "शिवसेनेतील सहकारी, राष्ट्रवादीतले कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पंतप्रधान मोदी यांनी वेगळं केलं. त्यासाठी आपण काय बोलत आहोत, ते अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी समजून घ्यायला हवं."
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत : संजय राऊत पुढं म्हणाले आहेत, की "कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांचं अवतार कार्य आता भाजपा संपवणार आहे. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असाही नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल," अशा पद्धतीचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा :