मुंबई Sanjay Raut On Akshay Shinde : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरण सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. हा फेक एन्काऊंटर असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. तर, दुसरीकडं 'आरोपीला फाशी द्या' अशी मागणी करणारे विरोधक अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्यावर त्याच्या बाजुनं बोलत असल्याची टीका महायुतीकडून केली जात आहे. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली केली. "त्या प्रकरणातील शाळेच्या संचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदे याचा बळी दिला," असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर ? : या प्रकरणावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "बलात्काऱ्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण, केवळ दोन लोकांच्या राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करण्यात आला असेल, तर ते चुकीचं आहे. इथं दोन व्यक्तींमध्ये स्पर्धा आहे. त्यापैकी एक राज्याचा मुख्यमंत्री आणि दुसरा उपमुख्यमंत्री असून दोघांमध्ये एन्काऊंटरचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. दोघांमधील या श्रेय वादावरून राज्यातील राजकारण कोणत्या थराला गेलं आहे, हे स्पष्ट होतं. गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 100 महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यापैकी किती जणांचा एन्काऊंटर झाला?," असा सवाल संजय राऊत विचारला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला झापलं : बदलापूर एन्काऊंटर बाबत बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला झापलं आहे. हा एन्काऊंटर खरा वाटत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. हा सत्याचा किंवा खोट्याचा प्रश्न नाही, तर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचा प्रश्न आहे. अशी प्रकरणं जलदगती न्यायालयात अडकू नयेत. जलद न्याय मिळायला हवा. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही एन्काऊंटर करत असाल, तर ते चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
नागपुरात अनेक बलात्कार झाले, तुम्ही किती आरोपींचा एन्काऊंटर केला : अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर राज्यात विविध ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावले जात आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "एकीकडं देवेंद्र फडणवीस बंदूक धरून आहेत, तर दुसरीकडं एकनाथ शिंदे बंदूक धरुन आहेत, हे फोटो म्हणजे जसं काय त्यांनी मोठं शौर्य दाखवल्याबद्दल परमवीर चक्रानं सन्मानित केलं जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात, नागपुरात अनेक बलात्कार झाले आहेत, तुम्ही किती लोकांचा एन्काऊंटर करणार आहात? कालच नालासोपारा इथं एका भाजपा कार्यकर्त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिस्टर फडणवीस, यावर तुम्ही काय करणार? एन्काऊंटर करणार का?," असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला.
हेही वाचा :
- अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, न्यायालयाकडून 15 दिवस तुरुंगवासाची शिक्षा - Sanjay Raut
- मनमाडची लढाई ही गद्दार विरुद्ध खुद्दार, पिसाळलेल्या हत्तीला लगाम घालणार ; खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Pm Modi
- काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार का? संजय राऊत म्हणतात... - nana patole likely Chief Minister