मुंबई Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रावर यावेळी विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा वाढवण्यावर सरकारचे विशेष लक्ष असल्याचं या अर्थसंकल्पातून दिसून आलं आहे. त्यासाठी सरकारने गतवर्षीपेक्षा दहा ते अकरा टक्क्याने अधिक तरतूद आरोग्यावर केल्याचं दिसून येत आहे अशी प्रतिक्रिया, आरोग्य विषयक तज्ञ आणि आयएमसीचे उपाध्यक्ष संजय मारीवाला यांनी व्यक्त केलीय.
डॉक्टरांचा वाढणार पगार : अधिक निधीची तरतूद आरोग्य क्षेत्रावर केल्यामुळं आता डॉक्टरांचे पगारही वाढवले जाणार आहेत. तसंच गोळ्या औषधांच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. ग्रामीण भागातील गरीब जनतेला या आरोग्य योजनांचा निश्चितच फायदा होईल असं मारीवाला यांनी सांगितलंय.
अर्थसंकल्पातील घोषणा : तरुणांना बळ देण्याचं काम मोदी सरकार करत आहे. तसंच 25 कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढलं असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी म्हणाल्या. 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान' या पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार काम सुरू आहे. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. तिहेरी तलाक प्रथा बंद केली आहे. यासोबतच महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहोत. पीएम आवास योजनेतील ७० टक्के घरं महिलांना देण्यात येणार आहेत, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, गेल्या 10 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल झाले आहेत. भारतातील लोक आशा आणि पर्यायांसह भविष्याकडे पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं समावेशाच्या सर्व बाबींची काळजी घेतली आहे.
हेही वाचा -