सांगली Sangli Lok Sabha Election Results : राज्यातील लक्षवेधी लोकसभा लढतींपैकी एक असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरू आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपाचे संजय पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, पहिल्या अर्ध्या तासानंतर काँग्रेसचे बंडखोर तसंच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या शर्यतीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मात्र मागे पडले आहेत.
विशाल पाटीलांची आघाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील सहापैकी सहा भागात विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. सांगलीत महाविकास आघाडीनं विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र, ही जागा ठाकरे गटाकडं गेल्यानं चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलं. त्यामुळं संतप्त झालेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. महाविकास आघाडीच्या मतांच्या विभाजनामुळं भाजपाचे संजय पाटील यांना फायदा होण्याची शक्यता होती. मात्र, मतमोजणीच्या पहिल्या तासानंतर विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे.
सांगलीत कोणाच्या गळ्यात पडणार विजयी माळ : सांगलीत जनतेमध्ये निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपाचे उमेदवार संजय पाटील करणार हॅट्ट्रिक की, उद्धव सेना चमत्कार घडवणार? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, विशाल पाटील यांच्या आघाडीमुळं सांगलीचा निकाल बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याची यंदाची लोकसभा निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली. स्थानिक तसंच राज्य पातळीवर उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष झाला. शेवटी महाविकास आघाडीची ही जागा उद्धव सेनेला गमवावी लागली. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली.
एनडीएची 350 जागांवर आघाडी : सकाळी दहा वाजताचे कल पाहता, लोकसभेच्या एकूण 543 पैकी एनडीए 350 जागांवर, काँग्रेस 87 जागांवर आणि इतर उमेदवार 28 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाराष्ट्रात महायुती 22 जागांवर तर महाविकास आघाडीचे उमेदवार 19 जागांवर आघाडीवर आहेत. यामध्ये भाजपा 14, शिंदे गट 6, अजित पवार गट 2, ठाकरे गट 7 आणि शरद पवार गटाचे उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस पक्षाचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत.
हे वाचलंत का :