मुंबई : Sangli Lok Sabha candidate : लोकसभा निवडणूक उमेदवारांची यादी महायुती आणि महाविकास आघाडीमधून आता जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीतील कल्याण जागेवरून तिढा सुटत नव्हता. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून सर्वांना धक्का दिला. तर, महाविकास आघाडीमध्ये अजून दोन-चार जागेवरुन तिढा सुटलेला नाही. दरम्यान, उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय मुंबई येथे होणार आहे. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेआधी त्या ठिकाणची पाहणी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
चंद्राहार पाटील हे महाविकास आघाडीचेच उमेदवार : काँग्रेस नेते विशाल पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगलीच्या जागेवरून दावा कायम आहे, आणि ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे, असं संजय राऊतांना विचारले असता. विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते आहेत... आम्ही त्यांचा आदर करतो... पण या जागेवर आमचाच उमेदवार निवडणूक लढवेल आणि चंद्राहार पाटील हे महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत असं राऊत म्हणाले. उद्या होणाऱ्या संयुक्त मविआच्या पत्रकार परिषदेत यावर अंतिम निर्णय होईलच असंही राऊत म्हणाले.
उद्या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होईल : पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत कोणतेही मतभेत किंवा वाद नाहीत. सांगलीच्या जागेवर शिवसेनेचाच (ठाकरे गट) उमेदवार निवडणूक लढवेल, असा पुर्नउच्चार यावेळी संजय राऊत यांनी केला. तसंच, उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यात तिन्ही पक्षाचे नेते सहभागी होतील. उद्या महाविकास आघाडीतील जागावाटप यावर अंतिम निर्णय होईल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
निरुपमांच्या आरोपांना महत्त्व नाही : आज माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाकाळात संजय राऊतांनी खिचडी घोटाळा केला. विविध मार्गाने आणि आपल्या कुटुंबांतील व्यक्तींच्या नावावर खात्यात पैसे वळते केले असा आरोप माजी खासदार संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर केलाय. तसंच, राऊतांचा उल्लेख 'खिचडीचोर' असा संजय निरुपम यांनी केला आहे, असा प्रश्न संजय राऊतांना विचारला असता, संजय निरुपम यांचे आरोप निराधार आहेत. त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. मी त्यांना अधिक महत्त्व देत नाही असं म्हणत त्यांनी निरुपमांच्या आरोपांना उत्तर देणं टाळलं.
हेही वाचा :
2 गुढीपाडव्याला मनसे 'एनडीए'त सहभागी होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले... - lok sabha election 2024