मुंबई- विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांनादेखील आमदारकीचे वेध लागले आहेत. आयआरएस अधिकारी समीर वानखेडेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या निकटवर्तीयनं दिलेल्या माहितीनुसार याबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल. मात्र, येत्या काही दिवसात लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे लवकरच शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार आहेत. वानखेडे महायुतीच्या तिकिटावर धारावीतून निवडणूक लढवू शकतात. त्यांना उमेदवारी मिळाली तर धारावी विधानसभा निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. धारावीत काँग्रेसला महायुतीकडून आव्हान मिळू शकते.
कोणत्या कारणांमुळे समीर वानखेडे आले चर्चेत
- समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझ या लक्झरी जहाजावर ड्रग्स छापा टाकून 17 हून अधिक लोकांना अटक केली होती. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचादेखील समावेश होता. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. एनसीबीकडून करण्यात आलेल्या तपासात आर्यन खान निर्दोष असल्याचं आढळले होते.
- तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबईमधील कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खान यांच्याकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात आहे.
- मुंबई 'एनसीबी'चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी 2022 मध्ये वाशिमच्या एका वृत्तपत्रात शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छांची जाहिरात दिली होती. त्यांच्या या जाहिराती नंतर राजकीय वर्तुळात समीर वानखेडे हे राजकारणात येणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या.
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं वानखेडे यांच्या कुटुंबियांना जून 2023 मध्ये धमकी मिळाल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली होती. मुंबई एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला होता. डी कंपनीच्या नावाने धमक्यांमुळे समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हे तणावात होते.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जातपडताळणी समितीकडे तक्रार केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. मात्र, जातपडताळणी समितीकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली.
मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार - राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे असणार आहेत.
हेही वाचा-