नाशिक: नांदगाव विधानसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, या मतदारसंघातून महायुतीनं विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. असं असलं तरी नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ हे लवकरच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे आज येवला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी समीर भुजबळ यांच्या अपक्ष लढण्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. "समीर भुजबळ हे त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत," अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
नेमकं छगन भुजबळ काय म्हणाले? राष्ट्रवादीचे ( अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, "कुणी म्हणतं की समीर भुजबळ हे मशालीवर निवडणूक लढणार? कुणी म्हणतं की तुतारीवर लढणार आहेत. मात्र,समीर भुजबळ अजून कुठेही गेलेले नाहीत. ते आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येवल्यात उपस्थित राहणार आहेत. ते अपक्ष लढणार की नाही, याबाबत त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. तुम्हा मीडियाला काही सांगितलं असेल तर मला काही कल्पना नाही. पण ते आता त्यांच्या निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत," असं छगन भुजबळ म्हणाले..
महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येईल- छगन भुजबळ म्हणाले, " महायुती आणि आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं आदेश दिल्यानं मी पुन्हा निवडणुकीला उभे राहिलो आहे. मी 1985 पासून विधानभवनात आहे. तुमच्या आशीर्वादानं आणखी पाच वर्ष बसणार आहे. नेहमीच्या निवडणुकीमध्ये थोडी स्पष्टता असायची. कोण कुठे आहे? आता मात्र अजून मला कळत नाही. कोण कुठे आहे ते? कोण कुठून उभा राहतोय? लोकसभेच्या वेळी महायुतीला फार मोठा सेटबॅक बसला. मात्र, नंतरच्या काळात महायुतीनं फार मोठी आघाडी घेतलीय. त्यामुळे पुन्हा महायुतीचं शासन येईल, अशी मला खात्री आहे."
- समीर भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
हेही वाचा-