छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Crime News: 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट सर्वांनाच चांगलच लक्षात राहिला. त्यात बळजबरीने जागा बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी चित्रपटातील नायक संजय दत्त काही वृद्धांसह रस्त्यावर आंदोलनाला बसतो. तसाच काहीसा प्रकार सध्या शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या एन १ भागात दिसून आला. भाडेकरू दुकान रिकामं करत नसल्याने चक्क वृद्ध दाम्पत्य हे दुकानासमोरच आंदोलनाला बसले आहेत. दुकानाचा केलेला भाडेकरारनामा संपुष्टात आला, तरी दुकान रिकामं करण्यास नकार देणाऱ्या भाडेकरू विरोधात हे आजी-आजोबा चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शहरातील मुन्नाभाई अशी चर्चा सुरू झाली आहे.
आजी-आजोबा बसले रस्त्यावर: एन वन भागातील गुलशन कुमार बत्रा आणि त्यांची पत्नी एलिझाबेथ बत्रा हे वृद्ध दांपत्य सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. शहरात उच्चभ्रू वस्तीतील दुकान त्यांनी किरायाने दिले होते. त्याचा भाडेकरारनामा संपुष्टात येण्याआधी सदरील दुकान रिकामे करावं, याकरिता नोटीस देण्यात आली होती. मात्र, भाडेकरूनं दुकान रिकाम केलंच नाही. उलट भाडे आणि विजेचे देयकदेखील थकवले आहे. याबाबत पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार केली. न्यायालयात धाव घेतली तरी मात्र, दुकान रिकाम होत नसल्याने, त्रस्त झालेल्या वृध्द दाम्पत्यानं चक्क दुकानासमोरच रात्रीपासून ठिय्या मांडला. मध्यरात्री पोलिसांनी त्यांची समजूत घालून त्यांना घरी पाठवले. मात्र सकाळ होताच हे दाम्पत्य पुन्हा एकदा दुकानासमोर उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत आम्हाला आमची दुकान मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा वृद्ध दाम्पत्यानं पवित्रा घेतला आहे.
तीन वर्षाचा होता करारनामा: ७० वर्षीय एलीझाबेथ बत्रा आणि त्यांचे पती ७६ वर्षीय पती त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, २०२० मध्ये नितीन आणि रोहित दशरथे यांना घरासमोरील जागा किराणा, डेली निड्स व्यवसायासाठी भाडयानं दिली. सप्टेंबर, २०२३ पर्यंत त्यांनी रीतसर 'लिव्ह अँड लायसन्स करार' केला. जून, २०२३ मध्ये त्यांनी सदर भाडेकरूला जागा रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली. परंतु त्यांनी ही जागा सोडली नाही. त्यामुळे याबाबत पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली. इतकंच नाही तर न्यायालयातदेखील धाव घेतली. मात्र, न्याय मिळत नसल्यानं त्यांनी अखेर सोमवारी रात्री घराबाहेर झोपून आंदोलन सुरू केले आहे. तर भाडेकरूचा भाऊ राजकारणी असल्यानं ते दबाव टाकत असल्याचा आरोप दुकान मालक एलिझाबेथ बत्रा यांनी केलाय.
भाडेकरू ने आरोप नाकारले: या आरोपांवर भाडेकरू असलेले नितीन दाशरथे यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्व फेटाळून लावलं आहेत. "भाडेकरारनामा करताना तीन वर्ष त्यात नमूद केले असले, तरी दोन वर्ष अतिरिक्त आम्ही मागितले होते. त्याचा रीतसर भाड देखील आम्ही देणार आहोत. मात्र, विनाकारण आम्हाला त्रास देण्याचे काम केलं जात आहे. आम्ही त्यांच्या वयाचा सन्मान नेहमीच केला आहे. आम्ही दुसरी जागा बाजूला घेतली आहे. ती तयार होण्यासाठी अजून पाच-सहा महिन्यांचा अवधी जाणार आहे. तो आम्ही काळ वाढून मागितला होता. परंतु सदरील आजोबांनी आम्हाला धक्काबुक्की करत चुकीची भाषा वापरली. त्यांच्या विरोधात आम्हीदेखील पोलिसात तक्रार दिलेली आहे." मात्र, करारनामा संपुष्टात आला तरी हे दुकान रिकामे का केली नाही? या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळलं.
हेही वाचा