मुंबई Mumbai Crime News : गयानाला जाण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आंतरराष्ट्रीय विमान कंपनी पुरवल्या प्रकरणी सहार पोलिसांनी (Sahar Police) सोमवारी हरियाणातील सात जणांवर गुन्हा दाखल केला. कागदपत्रांमध्ये नाशिक स्थित अशोका बिल्डकॉन कंपनीच्या प्रकल्पात पुरुषांची नियुक्ती करण्यासाठी कॉल लेटर, भारताच्या गृह मंत्रालयाचं एक पत्र आणि को-ऑपरेटिव्ह रिपब्लिक ऑफ गयानाच्या उच्चायुक्तालयाच्या एक पत्र यांचा समावेश आहे.
कोणती आहे कंपनी : तक्रारदार अब्दुल परवेज अब्दुल मलिक शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी (Sahar Police) भारतीय दंड संविधान कलम 120 ब, 34, 419, 420, 465, 468 आणि 471 अन्वये लखविंदर, असीम खान, शिवम, अंकित कुमार, प्रवीण, मनजीत सिंग आणि रोहित कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अशोका बिल्डकॉन विदेशात ब्रिज बनवण्याचं काम करते : तक्रारदार अब्दुल परवेज अब्दुल मलिक शेख हे अशोका बिल्डकॉन उपव्यवस्थापक आहेत. ते मूळचे मध्य प्रदेश येथील राहणारे असून सध्या ते नाशिक येथे राहतात. परवेज मागील वीस वर्षांपासून या कंपनीत नोकरी करत आहेत. अशोका बिल्डकॉन ही कंपनी विदेशात रोड आणि ब्रिज बनवण्याचं काम आणि कामाकरता मनुष्यबळ पुरवण्याचं काम करते. या कंपनीचे नाशिक आणि मुंबईत प्रत्येकी दोन दोन अशी चार कार्यालये आहेत.
एकूण आठ कागदपत्रे पाठवली : 26 फेब्रुवारीला सकाळी तक्रारदार परवेज घरी असताना त्यांना गयाना येथील प्रकल्प प्रमुख किशोर गड्डा यांचा कॉल आला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या व्हाट्सअपवर सहा कॉल लेटर, मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्सचं एक पत्र आणि हाय कमिशन ऑफ द को ऑफ रिपब्लिक ऑफ गयानाचं एक पत्र असे दोन प्रमाणपत्र अशी एकूण आठ कागदपत्रे पाठवली. त्या कागदपत्रांची पडताळणी करून या लोकांना आपण विदेशात काम करता पाठवत आहात का? याबाबत गड्डा यांनी परवेज यांच्याकडं विचारणा केली. त्यावेळी परवेज यांच्या लक्षात आलं की, या लोकांना कामानिमित्त आपण विदेशात पाठवलेले नाही. परवेज यांना व्हाट्सअपवर पाठवण्यात आलेली सहा कॉल लेटर हरियाणा येथील लखविंदर, हिमाचल प्रदेश येथील असीम खान, हरियाणा येथील शिवम आणि अंकित कुमार, प्रवीण, मंजीत सिंग आणि रोहित कुमार यांच्या नावावर होतं असल्याचं निष्पन्न झालं.
अद्याप कोणालाही अटक नाही : हरियाणातील 20 ते 24 वयोगटातील सात पुरुषांना कंपनीनं गयानाला पाठवले होते. या बनावट पत्रांची माहिती मिळाल्यानंतर, तक्रारदार यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांना सांगितलं की, ज्या तिकिटांसाठी जी कागदपत्रे दिली गेली आहेत ती मुंबई स्थित ट्रॅव्हल एजन्सीमार्फत बुक करण्यात आली होती. तपासा दरम्यान पोलिसांना समजलं की, कंपनीची कागदपत्रे आणि नावाचा अवैध वापर करून कोणीतरी लोकांना दक्षिण अमेरिकन देशात पाठवण्यासाठी करत आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ८ चे प्रमुख अधिकारी लक्ष्मीकांत साळुंखे यांनी सांगितलं की, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा -