छत्रपती संभाजीनगर (कन्नड) - तालुक्यातील भाबंरवाडी येथील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एका 15 वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले आहेत. ऋषिकेश विलास राठोड (वय 15) असं या मुलाचं नाव असून गावावर शोककळा पसरली आहे. बिबट्यानं मुलाला नाल्यात फरफटत नेत ठार केल्याची घटना दि. 26 बुधवारी रोजी सकाळी आठ वाजता निदर्शनास आली. त्यामुळं परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. बिबट्यानं तरुणाचा जीव घेतल्यानं भांबरवाडी गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुन्हा त्या बिबट्यानं कोणावर हल्ला करू नये, यासाठी बिबट्यास पकडून अभयारण्यात सोडावं, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रात्रीपासून होता बेपत्ता : घटनेबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भाबंरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांंच्या आई आश्रमात आला होत्या. 25 जून मंगळवार रोजी ऋषिकेश यांच्या घरी त्यांना जेवायला निमंत्रित करण्यात आलं होतं. रात्री साडेसात वाजता जेवण करुन ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईला सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. महाराज नेहमी प्रमाणे फिरायला गेले असल्यानं, महाराज येईपर्यंत थांब असं त्यांच्या आईनं ऋषिकेशला सांगितलं. मात्र, ऋषिकेश लघुशंकेसाठी आश्रमाच्या बाजूला गेला. बराच वेळ ऋषिकेश दिसेना म्हणून महाराजांच्या आईनं त्याला आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. महाराजांनी त्यांच्या घरी फोन लावला असता, तो घरी आलाच नाही, असं कळालं. रात्रीतून त्याचा शोध घेण्यासाठी नेतावाईकांनी धुळे, छत्रपती संभाजीनगरपर्यंत बरेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. परंतु ऋषिकेशचा तपास लागला नाही.
सकाळी सापडला मृतदेह : सकाळी नातेवाईकांनी आश्रमाच्या आजुबाजुला शोधाशोध केली असता जवळच असलेल्या नाल्यात ऋषिकेशचा मृतदेह दिसला. सरपंच राजु बेला राठोड यांच्या नातेवाईकांनी लगेच, कन्नड ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
'हे' वाचलंत का :