ठाणे : अवघ्या काही दिवसांवर 'दिवाळी' सण (Diwali 2024) येऊन ठेपला आहे. त्यासाठी बाजार फुलला असून खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झालीय. दिवाळी आणि फराळ हे दरवर्षीचं समीकरण आहे. आजच्या घाई गडबडीच्या काळात कामासाठी विदेशात गेलेल्या नागरिकांना फराळ करायला वेळ नसतो. त्यामुळं रेडिमेड फराळ (Readymade Diwali Faral) मागवण्याकडं नागरिकांचा कल वाढला आहे.
27 देशात पाठवला जातो फराळ : मुख्यमंत्र्यांचा जिल्हा अशी अलिकडे ओळख निर्माण झालेल्या ठाण्यातील 'ऋतू फुड्स' हे दरवर्षी हजारो किलो फराळ विदेशात पाठवत असतात. ऑट्रेलिया, दुबई, युके अशा वेगवेगळ्या 27 देशात सुमन परचुरे दिवाळीचा फराळ पाठवतात. या फराळात मराठी स्वाद असल्यामुळं जगभरातून फराळाची मागणी असते. दरवर्षी फराळाच्या ऑर्डरमध्ये वाढ होत असून त्यासाठी पूर्वतयारी एक महिन्यापासून सुरू आहे. आता शेवटच्या टप्प्यात पॅकींग करून कुरिअर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यंदा 25 टक्के फराळ महाग : दिवसेंदिवस तेल, डाळ, इंधनाच्या किंमतीत वाढ होत आहे. यावर्षी रेडिमेड फराळच्या किंमतीमध्ये त्यामुळे 25 टक्के वाढ झाली आहे. परंतु ग्राहकांच्या मागणीमध्ये कमतरता नाही. कुरिअरच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळं त्याचा परिणाम सर्वच पदार्थांच्या किंमतीवर झाला आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परदेशातल्या नागरिकांना फराळाची लज्जत चाखता यावी यासाठी ठाण्यातून दरवर्षी फराळ परदेशात पाठवला जातो. ठाण्यातील ऋतू फुड्सचे पदार्थ महिनाभर टिकतात. कारण त्यात चांगल्या प्रतीचं तेल, तूप वापरलं जातं आणि त्याचा परिणाम पदार्थ टिकण्यावर होतो. - सुमन परचुरे ,विक्रते
भारताला मिळतय परकीय चलन : दरवर्षीच्या या व्यवसायातून सुमन याना फायदा तर होतोच. मात्र, या व्यवसायामुळं भारताला परकीय चलन देखील मिळत आहे. जगभरातून येणाऱ्या ऑर्डरमुळं त्याचा फायदा देशाला देखील होत आहे.
हेही वाचा -