मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दौरे, नेत्यांच्या भेटीगाठी, पक्षप्रवेश अशा सर्व गोष्टी सध्या देशभरात सुरू आहेत. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतल्यानं चर्चा सुरू झाली आहे. मागील काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त असलेले अभिनेते गोविंदा या लोकसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीत रामदास आठवले यांनी गोविंदा यांच्यासाठी खास कवितादेखील म्हटल्यानं 'ती' सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी : याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करत करत आहे. या संदर्भात आठवले मागील काही दिवसांपासून बैठका, भेटीगाठी आणि दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच रामदास आठवले यांनी भोपाळ, कर्नाटक राज्यांचा देखील दौरा केला होता. त्यानंतर आज रामदास आठवले यांनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राजकारण तसंच आगामी लोकसभेसंदर्भातदेखील चर्चा झाली असल्याचं सध्या बोललं जातंय.
अभिनेते गोविंदा पुन्हा राजकारणात : अभिनेते गोविंदा यांनी 2004 साली काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस पक्षानं गोविंदा यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे त्याकाळचे मुंबईतील मातब्बर नेते राम नाईक यांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव करून सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर अभिनेते गोविंदा सक्रिय राजकारणापासून दूर होते. आता मागील काही वर्षात गोविंदा यांची भाजपाच्या ज्येष्ठ नेतृत्वाशी जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाच्या माध्यमातून गोविंदा पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात प्रवेश करतील असं बोललं जात आहे.
गोविंदा यांनी मानले आठवलेंचे आभार : गोविंदा यांनी आतापर्यंत 120 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या हीरो नंबर वन, कुली नंबर वन या चित्रपटांची चर्चा आजदेखील होत असते. तर, रामदास आठवलेदेखील एक कलाकार आहेत. त्यांच्या कविता नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आजच्या भेटीतदेखील रामदास आठवले यांनी अभिनेते गोविंदा यांच्यासाठी, 'जो कलाकार फिल्म इंडस्ट्री में आज भी है जिंदा, उनका नाम है गोविंदा' अशी कविता सादर केली. यावेळी गोविंदा यांनीदेखील कवितेतूनच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे आभार मानले आहेत.
हे वचालंत का :