नाशिक Raksha Bandhan 2024 : पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर अनेक राख्यांमध्ये केला जातो. तो वापर नागरिकांनी टाळावा, यासाठी नाशिकच्या विमल आजीबाईंनी पुढाकार घेत तब्बल 7 हजार पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती केलीय. या राख्यांचं मोफत वाटप करत पर्यावरणाचा संदेश दिला जात आहे. यापूर्वीदेखील या आजीनं मागील पाच वर्षात 13 हजार कापडी पिशव्या बनवून त्यांचं मोफत वाटप केलं आहे.
नाशिकच्या 70 वर्षीय विमलबाई वसमतकर यांनी दोन महिन्यात स्वखर्चानंल तब्बल 7 हजार फळभाज्यांसह विविध 74 प्रकारच्या बियांच्या तसेच कापडाच्या राख्या तयार केल्या आहेत. याचं राख्यांचं वाटप त्या पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालयात तसेच पर्यावरण विभागात करणार आहेत. मागील पाच वर्षात त्यांनी आतापर्यंत 13 हजारांहून अधिक कापडी पिशव्यांचं वाटप केलं आहे. त्यातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळा, असा त्या संदेश देतात.
पर्यावरण संवर्धनासाठी आवाहन : "पाच वर्षांपूर्वी घरी लग्नकार्यात नातेवाईकांनी आहेर म्हणून दिलेल्या नव्या कोऱ्या साड्या, शर्ट पीस, पॅन्ट पीस घरामध्ये मोठ्या प्रमाणत होते. या कपड्यांचा काय वापर करावा, हे मला समजतं नव्हतं. मग मी या कपड्यांपासून दिवसातून अनेक तास काम करत आकर्षक पद्धतीनं कापडी पिशव्या तयार करण्यास सुरुवात केली. या पिशव्या मी नातेवाईक आणि लग्न सोहळ्यात देऊ लागले. सुरुवातीला माझ्या पतीनं यावर आक्षेप घेतला. पण मी माझं काम सुरूच ठेवलं. यात आता, मला माझी सून आणि मुलगा हे खूप मदत करतात. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये शहरातील मुख्य बाजारात, मंदिरामध्ये, शाळेमध्ये जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी आवाहन करते. रक्षाबंधन झाल्यावर अनेक जण राख्या बाजूला टाकून देतात. मात्र याच राख्यांमधून पर्यावरण संवर्धन व्हावं, यासाठी त्या बियांपासून बनवण्यात आल्या आहेत. जेणेकरून त्यातून झाडांची निर्मिती होईल," असं विमल स्वामी यांनी सांगितलं.
प्लस्टिक बंदी व्हावी : "आईचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी पाच वर्षात आतापर्यंत 13 हजार कापडी पिशव्यांच वाटप केलं आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात आम्हीदेखील मदत करतो. या वयातदेखील त्यांचा उत्साह बघून आम्हालादेखील उत्साह येतो. मागील दोन महिन्यांपासून त्यांनी दिवसातून पाच ते सहा तास काम करत 7 हजार पर्यावरण पूरक राख्या बनवल्या आहेत. यात डाळिंब,पेरू, चिकू, आंबा, टोमॅटो, भेंडी, कांदा यासह तब्बल 78 बियांचा वापर केला आहे. त्यामागे प्लास्टिक बंदी होऊन, पर्यावरणाचं रक्षण व्हावं हा हेतू आहे" असं आजींची सून शर्मिला वसमतकर यांनी सांगितलं.
'या' पासून बनवल्या राख्या : काजू, बदाम, अक्रोड, शेवगा, आंबा, चिकू, जांभूळ, मोसंबी, संत्री, लिंबू, कांदा, टोमॅटो, मुळा, भेंडी, वांगी, लसूण, आलं, गवार, पालक, कारले, राजमा, बोर, दोडके, पपई, साबुदाणा, भगर, शेंगदाणे, वटाणे, सर्व डाळी, कापूस, सुपारी, तीळ बत्ताशे, खडीसाखर, फुलांच्या बिया तसेच कापडांपासून राख्या बनवल्या आहेत.
हेही वाचा