मुंबई Rajya Sabha Bypoll Election 2024 : महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांपैकी एका जागेवर भाजपानं धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरी जागा ही भाजपानं महायुतीमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडली आहे. धैर्यशील पाटील यांच्याकडं दक्षिण रायगड जिल्ह्याची जबाबदारी असून ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीनं भाजपानं कोकण तसेच मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण तसेच मुंबईवर लक्ष : महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी रिक्त झालेल्या दोन जागांपैकी एका जागेवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं भाजपाचे धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. धैर्यशील पाटील हे शेतकरी कामगार पक्षामधून भाजपामध्ये दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा दाखवली होती. परंतु महायुतीमध्ये रायगडची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे त्यांनी पक्षादेश मानत माघार घेतली. या जागेवरून अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. रायगड जिल्ह्यात धैर्यशील पाटील यांना मोठा जनाधार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षानं कोकण तसेच मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवार यांच्यासाठी एक जागा : महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या, या दोन्ही जागावर भाजपाकडून उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटानं भाजपाकडं एका जागेची मागणी केली. त्यानुसार आता राज्यसभेची एक जागा अजित पवार यांच्या गटाला सोडण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपाकडून राज्यसभेसाठी धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता अजित पवार गट त्यांच्या पक्षातर्फे राज्यसभेवर कोणाची वर्णी लावतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नितीन पाटील यांना संधी ? : आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाला निवडून आणण्याचं आवाहन पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केलं. तसेच साताऱ्यात भाजपाचा उमेदवार निवडून आणल्यास साताऱ्यामधील नितीन पाटील यांना राज्यसभेत पाठवले जाईल, असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. आता त्याच अनुषंगानं नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा असून या जागेवर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे.
भाजपाकडून राज्यसभेसाठी ९ उमेदवार जाहीर :
महाराष्ट्र
धैर्यशील पाटील
आसाम
मिशन रंजन दास
रामेश्वर तेली
बिहार
मनन कुमार मिश्रा
हरियाणा
श्रीमती किरण चौधरी
मध्य प्रदेश
जॉर्ज कुरियन
ओडिशा
श्रीमती ममता मोहंता
राजस्थान
सरदार रवणीत सिंह बिट्टू
त्रिपुरा
राजीब भट्टाचार्य