नागपूर : नागपूरमध्ये येत्या 6 नोव्हेंबरला 'संविधान संमेलन' (Samvidhan Sammelan) होणार आहे. या संमेलनाचं आयोजन ओबीसी युवा अधिकार मंच या संघटनेनं केलं आहे. या संमेलनाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील उपस्थित राहणार आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. तसंच या संमेलनात मनुवाद, संविधान, मनुस्मृतीत महिलांचं स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये किती फरक आहे, यावर चर्चा होणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही : "नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाचं निमंत्रण राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वीकारलंय. या संमेलनात विदर्भातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. ओबीसी युवा मंच यांनी संमेलनाचं निमंत्रण दिलं होतं. उमेश कोर्राम आणि अनिल जयहिंद यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी असतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच हा पूर्णतः अराजकीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप नाही. आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच कार्यक्रम होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.
संविधान बदलण्याचा डाव : प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कार्यक्रमाचे आयोजक अनिल जयहिंद म्हणाले की, "महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे दिले जाणार आहेत. हा देशाला मोठा धोका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. संविधानानं आपलं रक्षण केलंय. देशातील प्रत्येक माणसाला संविधानामुळं हक्क मिळाले. आता संविधान बदलून मनुस्मृती आणली तर काय होईल ही भीती लोकांच्या मनात आहे."
हेही वाचा -