नंदुरबार Rahul Gandhi in Maharashtra - भारत जोडो न्याय यात्रेसाठी राज्यासह देशातून काँग्रेस पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत. 14 वर्षानंतर गांधी परिवारातील नेत्याची सभा होत असल्यानं काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. राहुल गांधी यांच्या सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्यांचा आज रोड शोदेखील होणार आहे.
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होत आहे. महाराष्ट्रातील यात्रेचा प्रारंभ नंदुरबार शहरापासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. राहुल हे आज दुपारी सुमारास हेलिकॉप्टरनं नंदुरबार येथे दाखल होणार आहेत. पोलीस मुख्यालयापासून सभास्थळापर्यंत भव्य रोडशोचं आयोजन करण्यात आलं आहे. सभास्थळी आदिवासी सांस्कृतिक नृत्यानं राहुल यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी होळीचे पूजन देखील होणार आहे. नंदुरबार शहरातील सी. बी. ग्राउंड या परिसरात राहुल गांधी यांची सभा होत आहे. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव येतील अशी व्यवस्था नंदुरबार जिल्हा काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे.
गांधी परिवारातील सदस्य 14 वर्षानंतर नंदुरबार जिल्ह्यात दाखल होत असल्यानं काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी
गांधी यांचा असा आहे दिवसभरातील कार्यक्रम- खासदार राहुल गांधी आज दुपारी दीड वाजता सुरत येथील विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजून १० मिनिटे ते २ वाजेपर्यंत सुरतमार्गे नंदुरबारला हेलिकॉप्टरनं पोहोचणार आहेत. दुपारी दोन वाजता नंदुरबारच्या पोलीस मुख्यालय येथील हेलिपॅडवर पोहोचणार आहेत. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत धुळे चौफुली येथे रोड होणार आहे. दुपारी तीन ते साडेतीन ध्वज कार्यक्रम, साडेतीन ते पावणेचार वाजता होळी पुजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम तर पावणे चार ते साडेचार वाजता जनसमुदायाला मार्गदर्शन करणार आहेत. राहुल गांधी हे सांयकाळी साडेचारनंतर सोयीनुसार दोंडाईचाकडं प्रयाण करणार आहे.
नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला- भारत जोडो न्याय यात्रेसाठी राज्यातील सर्वच काँग्रेसचे ने ते एकवटले आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी हे लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारपासून करत असल्याची राजकीय वर्तुळाच चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. अशातच राहुल गांधी हे महाराष्ट्रात येत असताना त्यांच्या महाराष्ट्र भेटीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा-