भंडारा Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून काँग्रेस पक्षाचे सर्व नेते प्रचारात व्यस्त आहेत. शनिवारी भंडारा-गोंदिया मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, आम्ही अदानींचं नाही तर शेतकरी, गरीब, बेरोजगारांचं सरकार चालवणार आहोत. अग्निवीर ही सैन्याची योजना नसून मोदींच्या डोक्यातली योजना आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. आमचे सरकार आल्यावर आम्ही अग्निवीर योजना बंद करू, आम्ही बँकांचे राष्ट्रीयीकरण केलं, हरितक्रांती केली, दूध क्रांती केली, पण मोदी 24 तास धर्मावर बोलतात, असा टोला त्यांनी लगावला.
मोदींनी उद्योगपतींसाठी सरकार चालवलं : गेल्या 10 वर्षांत मोदींनी काही निवडक उद्योगपतींसाठी सरकार चालवलं. मोदींचे सरकार आले, तर अदानींच्या शेअरचे भाव वाढतात, हे अदानींचे सरकार आहे. सीबीआय, ईडीच्या दबावाखाली मुंबई विमानतळ अदानीकडं सोपवलं. भारतातील सर्व बंदरे त्यांच्या हातात आहेत. आज देशातील 22 लोकांकडं एवढी संपत्ती आहे, जेवढी देशातील 70 टक्के लोकांची संपत्ती आहे. मोदी हिंदू, मुस्लिमांवर चर्चा करतात, असेही राहुल गांधी म्हणाले.
महिलांना दरमहा 8 हजार 500 रुपये : आमच्या जाहीरनाम्यातील 5 प्रमुख आश्वासनं आहेत. आम्ही आमचा जाहीरनामा विचारपूर्वक तयार केला आहे. तो बंद खोलीत बनवला गेलेला नाही. हजारो लोकांशी संवाद साधल्यानंतर जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यामुळं हा देशातील जनतेचा जाहीरनामा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं दिलेल्या हमीभावाचा पुनरुच्चार करताना राहुल गांधी यांनी महिला, तरुण, शेतकरी, व्यापारी यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या हक्कासाठी 8 हजार 500 रुपये दरमहा देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सरकार येताच जातगणना करणार : देशात मागासवर्गीयांना हक्क मिळत नसल्याबाबत राहुल गांधी यांनी भाष्य केलंय. इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होताच, जात प्रगणना करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केलीय. त्यामुळं जातीच्या तुलनेत कोण किती प्रतिनिधित्व करत आहे, याची आकडेवारी देशासमोर येणार असल्याचं ते म्हणाले. एक आदिवासी म्हणून देशाच्या राष्ट्रपतींना राम मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. अदानी, अंबानींना होती, अशी टीका त्यांनी भाजपावर केलीय.
हे वाचलंत का :
- कल्याणचा गड जिंकण्यासाठी ठाकरेंची मोर्चेबांधणी, विनोद घोसाळकर यांच्यावर दिली जबाबदारी - Lok Sabha Elections 2024
- 'मोदींमुळंच राम मंदिर झालं', राज ठाकरेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं; उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच संपवली पत्रकार परिषद - Raj Thackeray
- आम्हाला राज्य नाही तर सेवा करायचीय; अनुराग ठाकुर यांचं उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर - Anurag Thakur