नाशिक- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्रात पोहोचत आहे. राहुल गांधी यांचे 13 मार्चला रात्री मालेगाव येथे आगमन होईल. या यात्रेत राहुल गांधी हे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक व युवती यांच्याशी ठिकठिकाणी संवाद साधणार आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेच्या जंगी स्वागतासाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, चांदवडचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय जाधव यांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी नाशिक तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राहुल गांधी यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांना एकत्रित आणण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या प्रश्नांवर वक्तव्य करणार असल्याची चर्चा- चांदवडच्या जाहीर सभेत खासदार गांधी हे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कांदा, द्राक्ष, टोमॅटो, ऊस सोयाबीन आणि कापूस या पिकांचे पडलेले बाजारभाव यावर लक्ष वेधणार आहेत. तसेच आदिवासी, गोरगरीब जनता, नोकरदारांचे प्रलंबित प्रश्न, बेरोजगारी, राज्यात सुरू असलेले फोडाफोडीचं राजकारण, शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग आणि महागाई वाढल्यानं होणारे सर्वसामान्यांचे हाल यावर खासदार राहुल गांधी सभेतून प्रकाश टाकणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी दिली.
आदिवासी समाजाचा मेळाव्याला हजेरी लावणार- चांदवडच्या सभेनंतर ओझर मार्गे दुपारी पदयात्रा नाशिक शहरात पोहोचणार आहे. यानंतर द्वारका सर्कल तेथून पुढे सारडा सर्कल येथे राहुल गांधी पोहोचणार आहेत. पदयात्रा ही मुस्लिम समाज बहुसंख्याक असलेल्या जुन्या नाशिकमधील दूध बाजार चौकापर्यंत येईल. वाटेत मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या स्वागताचं नियोजन करण्यात आलं आहे. मेन रोडकडे ही यात्रा मार्गक्रमण करेल. गाडगे महाराज पुतळ्यापासून यात्रा शालिमारला येथे पोहोचेल. तेथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील. या ठिकाणी चौक सभेला राहुल गांधी संबोधित करतील. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होईल. बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतील. राहुल गांधी हे आदिवासी समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.
राजकीय नेत्यांकडून काळाराम मंदिराचे दर्शन- अयोध्येतील 22 जानेवारी रोजी झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकच्या श्री काळाराम मंदिरातून केली होती. तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील श्री काळाराम मंदिरात सहपरिवार महापूजा केली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्री काळाराम मंदिरात जाऊन पूजेसह आरती केली. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेदेखील 14 मार्च रोजी श्री काळराम मंदिराला भेट देणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची नाशिक जिल्ह्यातील सभा राजकीयदृष्ट्या महत्वाची ठरणार आहे.
हेही वाचा-