पुणे Pune Traffic Rules Fines : 'पुणे तिथं काय उणं' ही म्हण आपण नेहमी ऐकतो आणि याचीच प्रचिती देखील वेळोवेळी येत असते. शहरातील वाहतूक कोंडी पुणेकरांना काही नवीन नाही. मात्र, आता याच वाहतूक कोंडीबरोबर पुणेकर वाहतुकीचे नियम मोडण्यात पुढे असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 21 जणांनी 100 वेळा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं. या 21 जणांनी दंडसुद्धा भरलेला नाही, अशी माहिती समोर आली.
वाहतूक नियम मोडण्यात पुणे टॉपवर : पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांना पोलिसांकडून ऑनलाईन चलनद्वारे दंड भरण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आली. असं असताना पुणे शहरात तब्बल 21 जणांनी 100 वेळा वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांनी दंड देखील भरलेला नाही. अशा या 21 पुणेकरांची विशेष यादी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने तयार केली आहे. या २१ वाहनधारकांनी जर वेळेत दंड भरला नाही तर त्यांचे लायसन्स रद्द होणार आणि त्यांना न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
काय आहे नेमकी मोहीम? : पुणे पोलिसांनी आखलेल्या या अनोख्या मोहिमेबद्दल अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी याबाबत सांगितलं की, "आमच्याकडं एक ॲप आहे ज्यात आपल्याला कळतं की कोणत्या वाहनधारकावर किती दंड आहे. पहिली गोष्ट की कोणीही वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन करू नये, जर कोणी उल्लंघन केलं असेल तर त्याने तो दंड भरावा कारण वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे आणि ते खूपच गरजेचं आहे."
वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम : वाहतूक पोलिसांनी काढलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात 21 वाहनचालक असे आहेत, ज्यांच्यावर एक लाख वीस हजार एवढा दंड आहे. विशेष म्हणजे त्या वाहनाची किंमत देखील त्यापेक्षा खूपच कमी आहे. तर 50 पेक्षा जास्त दंड असणारे 988 वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे.
21 वाहनांनी 100 वेळा मोडले नियम : पुण्यातील एका वाहनचालकानं 154 वेळा नियम मोडले असून, त्याच्यावर 1 लाख 21 हजार रुपये दंड आहे. तर दुसऱ्या वाहनचालकावर 130 वेळा कारवाई झाली आहे. आता पुणे पोलिसांनी सर्वाधिक दंड झालेल्या काही वाहनांची माहिती घेतली असता त्यात 21 वाहनांवर 100 पेक्षा जास्त तर तब्बल 988 वाहनांवर 50 पेक्षा जास्तवेळा वाहतूक नियम मोडल्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे, असं यावेळी पाटील म्हणाले.