अमरावती : सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेल्या मेळघाटाच्या घनदाट जंगलात उंच पहाडांवर चढणं आणि घाट वळणानं उतारावरून दुसऱ्या भागाकडं जाणं असा प्रवास वाहनांमधून करतानाही भीती वाटते. असं असताना प्रचंड शुकशुकाट असणाऱ्या या घनदाट जंगलातून पुण्यातील सहा ज्येष्ठ नागरिकांनी सायकलवर स्वार होऊन आठ दिवसात 500 किलोमीटर जंगल भ्रमंती केली. देशातील विविध भागात आजवर सायकलनं प्रवास केला. मात्र त्यापेक्षा मेळघाटातील प्रवास हा अतिशय थरारक आणि अविस्मरणीय असल्याचा अनुभव या ज्येष्ठ नागरिकांनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शेअर केला.
पुण्यातून आली पाच जणांची टीम : वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी चंद्रशेखर हे गत सात आठ वर्षांपासून सायकल चालवण्याचा छंद जोपासतात. त्यांनी देशातील विविध भागात सायकलनं भ्रमंती केली आहे. चंद्रशेखर त्यांच्या पत्नी 61 वर्षाच्या शामला चंद्रशेखर यांच्यासह 77 वर्षाच्या निरुपमा भावे, 67 वर्षाचे उमेश ढोपेश्वर, 59 वर्ष वयाच्या एकादशी कोल्हटकर आणि 57 वर्ष वयाच्या ज्योती महिंद्रे भक्त यांचा मेळघाट भ्रमंतीसाठी आलेल्या टीममध्ये सहभाग आहे. 27 नोव्हेंबरला अमरावती शहरातून या सहा जणांची टीम मेळघाटच्या दिशेनं निघाली. गुरुवारी नवव्या दिवशी हे सारे मेळघाटच्या जंगलात सुमारे पाचशे किलोमीटर जंगल सायकलवर फिरून अमरावतीला दुपारी चार वाजता पोहोचले.
बहिरम मार्गे मेळघाटात एन्ट्री : "पुण्यावरून अमरावतीला ट्रेननं पोहोचल्यावर 27 नोव्हेंबरला सकाळी या सहाही जणांचा प्रवास अमरावतीवरून मेळघाटच्या दिशेनं सुरू झाला. बहिरम येथून मध्यप्रदेशातील जंगलातून या पाचही जणांच्या सायकल मेळघाटात शिरल्या. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात येणाऱ्या कुकरू येथून मेळघाटातील चौराकुंड, रंगूबेली, कुटुंगा, बैरागड, लवादा, हरिसाल, सेमाडोह, घाटांग, आमझरी, चिखलरा, मोथा, मडकी, धामणगाव गढी असा प्रवास करून परतवाडा मार्गे पुन्हा मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात येणाऱ्या सातपुडा पर्वतावरील मुक्तागिरी असा प्रवास आम्ही केला. मुक्तागिरी येथे जैन मंदिर पाहिल्यावर पुन्हा परतवाडा मार्गे अमरावतीच्या दिशेनं निघालो आणि वाटेत दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या महिमापूर येथील ऐतिहासिक पायविहीर पाहिली," असं ज्योती महिंद्रे भक्त यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
महिनाभरापूर्वी केली रेकी : "या टीमचे प्रमुख असणारे चंद्रशेखर यांनी महिनाभरापूर्वी अमरावतीत असणारे त्यांचे मित्र संदीप गोडबोले यांच्यासोबत मेळघाटची पाहणी केली. नेमक्या कोणत्या मार्गानं सायकलनं प्रवास करता येईल, तो मार्ग त्यांनी निश्चित केला. वन खात्यातून सेवानिवृत्त झाल्यामुळे या भागातील वन अधिकाऱ्यांनी देखील त्यांना चांगलं सहकार्य केलं. मुक्कामाची ठिकाणं आधीच ऑनलाइन बुक करण्यात आली," अशी माहिती देखील ज्योती महिंद्रे भक्त यांनी दिली.
दिवसाला 60 ते 70 किलोमीटर टार्गेट : "गत सात ते आठ वर्षात भारतातील अनेक भागात सायकलनं आम्ही फिरलो, मात्र जंगलातून सायकल चालवण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता," असं शामला चंद्रशेखर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या. "आम्ही मेळघाट ऐकला खूप आहे, मात्र जवळून पाहण्याचा पहिल्यांदाच योग आला. मेळघाटातलं सायकलींग हे निश्चितच अवघड असणार, याची जाणीव होती. यामुळं तशा तयारीनंच आम्ही आलोत. सराव म्हणून आम्ही शनिवारी आणि रविवारी लांब जायचो. आमच्यापैकी अनेकांनी सायकलनं संपूर्ण भारतभ्रमण केलंय. आम्ही पुणे कन्याकुमारी सायकलिंग केलं. काही लोकांनी पुणे ते जम्मूपर्यंत सायकलिंग केलंय. गुजरात आणि ओडिसामध्ये देखील आम्ही सायकलींग केलं असून त्या सरावाच्या बळावरच इकडं मेळघाटात दिवसाला 60 ते 70 किलोमीटर चढ -उतार आपण करू शकू असा विश्वास घेऊनच आलोत. मेळघाटचा प्रवास हा अतिशय छान होता. इकडल्या लोकांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आमच्यासाठी हे कौतुकाचं नव्हतं, मात्र इकडच्या लोकांना आमचं कौतुक वाटलं. सगळ्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं. मेळघाटातील लोक फार छान होती. इतरत्र ज्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा दिसतो, त्या तुलनेत मेळघाटात प्लास्टिकचा कचरा नगण्य होता," असं देखील शामला चंद्रशेखर म्हणाल्या.
इंधन वाचवा आणि आरोग्य जपा हा संदेश घेऊन भ्रमंती : गत सहा, सात वर्षांपासून आम्ही सायकलिंग करत आहोत. आमच्या या ग्रूपमध्ये पाच- सहा महिला आणि तीन-चार पुरुष आहेत. विविध भागातील प्रवासात यापैकी काही मंडळी हे त्यांच्या सोयीनं सहभागी होतात. पुणे - कन्याकुमारी, पुणे ते सुंदरबन, पुणे ते जम्मू असं लांब अंतरापर्यंत आमचं सायकलींग चालतं. या प्रवासामागचा आमचा खरा उद्देश म्हणजे ज्या गावात आम्ही जातो, त्या ठिकाणी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी जनजागृती करतो. यामुळे इंधनाची बचत होईल आणि आपला आरोग्य देखील सुदृढ राहील, असाच संदेश देतो, असं या टीमचे प्रमुख चंद्रशेखर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
कात्रज घाटात केला सराव : "जंगल भ्रमंती आम्ही पहिल्यांदाच प्लॅन केली. मेळघाट हा अतिशय टफ आहे. हा आमचा युनिक एक्सपिरीयन्स होता. मेळघाटसाठी आम्ही ऑक्टोबर महिन्यापासून सरावाला सुरुवात केली आणि पुण्याजवळच्या कात्रज घाटामध्ये खास करुन आम्ही सराव केला. त्या सरावामुळेच टफ असणाऱ्या मेळघाटात आम्हाला फायदा झाला. जे काही सायकल लव्हर्स आहेत त्यांनी वनविभागाची परवानगी काढून नक्कीच मेळघाटात सायकलिंगचा अनुभव घ्यावा," असं देखील चंद्रशेखर म्हणाले.
हेही वाचा :