पुणे- "पुणे तिथं काय उणे' हे नेहमीच म्हटल जातं, याची प्रचितीदेखील वेळोवेळी विविध माध्यमातून येत असते. आज पुण्यातील रेल्वे स्टेशन येथे देखील अशीच घटना घडली आहे. फोनवर पत्नीशी भांडण झालं म्हणून एक युवक चक्क रेल्वेच्या छतावर चढला होता. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला रेल्वे पोलिसांनी यशस्वीरित्या खाली उतरवले आहे. हा व्यक्ती मूळचा बिहारचा असल्याच रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्याचं संजय कुमार दरोगी शर्मा (वय 28) असे आहे. अधिकचा तपास पुणे रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर सकाळच्या वेळेस (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) मनोरुग्ण चढला होता. काही वेळानंतर त्याला खाली उतवण्यात आलं आहे. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता. त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वेकडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे. ही घटना नव्यानं उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर घडलेली आहे. या पुलाला लागूनच मेट्रोचे नवीन स्थानक आहे. त्यातून अथवा रेल्वेच्याच परिसरातून हा व्यक्तीवरती चढल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत लोहमार्ग पोलीस अधिकारी म्हणाले की," सदरील व्यक्तीला आमच्या कर्मचाऱ्यांकडून खाली उतरवण्यात आले. त्याची सखोल विचारपूस करण्यात येत आहे. या व्यक्तीकडून खाली उतरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्याची चौकशी सुरू आहे. मात्र सदरील व्यक्ती उडवाउडवीची उत्तर देत आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांना बोलविण्यात आले आहे. त्यांच्याकडूनही या युवकाची चौकशी केली जात आहे. बिहारमधील त्याच्या नातेवाईकांना पुण्यात बोलावून घेतलं आहे.