पुणे : विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, राज्यभर आता निवडणूक अधिकारी तसेच पोलिसांकडून नाकाबंदी आणि तपासण्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खेड शिवापूर येथे एका गाडीत पाच कोटी रुपये सापडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचं सोनं पकडलं होतं. हे सोनं डिलिव्हरीचं असल्याचं सांगितल जात आहे, पण सध्या पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. जप्त केलेलं सोन हे अनेक सराफी संस्थेचे असल्याचं यावेळी कमोडिटी तज्ञ अमित मोडक यांनी सांगितलं.
138 कोटींचं सोनं पकडलं : विधानसभा निवडणुकीत कुठल्याही प्रकारे पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचं सोनं पकडलं होतं. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. हे सोनं नेमकं कुठून आलं आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील खेड शिवापूर येथे एका गाडीत पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर हडपसर येथे 22 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. आता सहकार नगरमध्ये तब्बल 138 कोटींचे सोने पकडले असून, हे सोने कुठून आले? एवढ्या किंमतीचे सोने कुठे जात होते? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून तपास सुरू : याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की, "सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वत्र पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. अशीच नाकाबंदी सहकार नगर येथे सुरू असताना सकाळी नऊच्या सुमारास एक टेम्पो जात असताना त्याची चौकशी केली. यावेळी पांढऱ्या रंगाच्या पोत्यात काही बॉक्सेस आढळले. टेम्पो चालकाची चौकशी केली असता ही ज्वेलरी असून ती मुंबई कार्यालयाकडून पुण्याच्या दिशेनं येत होती अशी माहिती मिळाली. चौकशी झाल्यानंतर निवडणूक अधिकारी तसेच इन्कम टॅक्स अधिकारी यांना देखील बोलवून त्याची तपासणी सुरू आहे."
सोनं अधिकृत असल्याची माहिती : याबाबत कमोडिटी तज्ञ अमित मोडक म्हणाले की, "सर्वत्र बातम्या येत आहेत की आचारसंहिता सुरू असताना 138 कोटी रुपयांचे सोने हे पकडण्यात आले आहे. सिकव्हेल लॉजेस्ट्री म्हणून जे दागिन्यांची सर्व्हिस देत असतात त्या गाडीतून हे सोने येत होते. गाडीत जे सोनं असतं त्याची माहिती ही फक्त दोन्ही सराफांना असते. याबाबत अधिक माहिती ही चालकाला नसते. आज जे दागिने पकडण्यात आले आहेत, ते अनेक सराफी संस्थांचे दागिने असून, एका सराफी संस्थेने दुसऱ्या सराफी संस्थेला पाठवलेले हे दागिने आहेत. तसेच प्रत्येक दागिन्यांसोबत इन्व्हाईस जीएसटी पोर्टलवर पंच करून ते जनरेट झालेलं असतं आणि याची माहिती जीएसटी विभागाला असते. यात कोणतीही अनधिकृत माहिती नसते."
गैरप्रकार टाळण्यासाठी खबरदारी : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून कोट्यवधी रूपये जप्त करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. गाड्यांची तपासणी केली जात आहे, त्या तपासणीत आता हे सोनं सापडलं आहे.
5 कोटी रुपयांची रक्कम जप्त : पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे पोलिसांकडून 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. शिवापूर टोल नाक्यावर एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार चेक करण्यात आली. या कारमध्ये काही रक्कम असल्याचं आढळलं. त्यानंतर कार पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तिथं निवडणूक अधिकारी तसंच प्रशासनाला बोलवण्यात आलं आणि व्हिडिओ ग्राफी करत पंचनामा करण्यात आला. पंचनामा केल्यावर, जवळपास 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आणि आयकर विभागाकडे पुढील चौकशीसाठी ही रक्कम देण्यात आली होती. सर्व नोटा या 500 रुपयांच्या होत्या.
हेही वाचा