पुणे Pune Porsche Accident : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून आज पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक केलीय. या प्रकरणात पहिल्या दिवसांपासून आमदार सुनील टिंगरे यांचं नाव सातत्यानं समोर येतय. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी सुनील टिंगरे यांना फोन केल्यानंतर ते पोलीस ठाण्यात पोहोचले होते. आमदार टिंगरेंनी अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलय.
सरकारकडून गांभीर्यानं चौकशी सुरू : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असून नाना पेठ येथील एका दुकानाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांना कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणाबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत मांडलं. सरकारकडून या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
सुनील टिंगरेंवर होणारे आरोप बिनबुडाचे : प्रसार माध्यमांसमोर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सुनील टिंगरे त्या दिवशी तिथं होते आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांच्या भागात घटना घडली म्हणून ते पोलीस ठाण्यात गेले. सुनील टिंगरे यांनी कुठेही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला नाही. राज्यात सर्वत्र त्या त्या भागातील आमदार एखादी घटना घडली तर पोलीस ठाण्यात जात असतात. आमदार त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना योग्य चौकशी करण्याचा सूचना देत असतो. त्यानुसार आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही. टिंगरेंवर करण्यात येत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नाही असं अजित पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं.
दोषींवर कारवाई : या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलीय. अल्पवयीन मुलाच्या नावानं कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते याची देखील चौकशी सुरू आहे. हे प्रकरण सरकारनं गांभीर्यांन घेतलं आहे. रोज तपास पुढे सरकत आहे. दोषींवर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला अटक झाली नव्हती, मात्र नंतर त्याला अटक करण्यात आलीय. त्यानंतर मुलाच्या वडिलांना, आजोबांनाही अटक करण्यात आलीय. त्यामुळं या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा
- विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या 15 व्या शतकातील विष्णू अवतारातील मूर्ती - vitthal rukmini mandir
- मेळघाटातील 'मडकी' रिकामी! हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण - Amravati Water Scarcity
- शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग; बॉम्ब पथकाकडून तपास सुरू - Pune News
- बिल्डर ललित टेकचंदानी विरोधातील ईडीच्या आरोपपत्राची विशेष न्यायालयानं घेतली दखल - lalit Tekchandani