पुणे Guinness World Record Pune : 'पुणे तिथे काय उणे' हे आपण नेहमीच ऐकत आलोय. याची प्रचितीदेखील आपल्याला वेळोवेळी येते. सध्या सोशल मीडियाच्या युगात अनेक ज्येष्ठ नागरिक तरुणांना लाजवेल असे रील्स तसंच व्हिडिओ करताना आपण पाहिलय. जर आपण एखाद्याला नाकाला जीभ पोहचते का लावून दाखव, असं म्हटलं तर क्वचितच एखाद्याची जीभ नाकाला स्पर्श करते, ती पण काही सेकंदांसाठी. मात्र, पुण्यातील 77 वर्षाच्या आजोबांनी चक्क नाकाला जीभ लावण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला. त्यांची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये झाली.
पुण्यातील कसबा पेठ येथं राहणाऱ्या 77 वर्षीय भूमकर काका यांनी चक्क नाकाला जीभ लावण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला. पुण्यातील कसबा पेठ येथील शिंपी आळीतील सोपान ऊर्फ काका भूमकर या आजोबांनी 10 ते 15 मिनिटं नाही, तर चक्क 1 तास 3 मिनिटं 39 सेकंद नाकाला जीभ लावून रेकॉर्ड केला.
बातमी वाचल्यानंतर घेतला निर्णय : याबाबत बोलताना सोपान उर्फ काका भूमकर म्हणाले, "मी सध्या 77 वर्षांचा असून रोज सकाळी पेपर वाचतो. गेल्यावर्षी पेपर वाचत असताना एका मुलीनं 21 मिनिटं नाकावर जीभ लावल्याची बातमी वाचली. त्यानंतर मी विचार केला, मी देखील हे करू शकतो. पहिल्या दिवशी 20 मिनिटं, दुसऱ्या दिवशी थेट 90 मिनिटं जीभ नाकाला लावली. मी माझ्या मुलाला याबद्दल सांगितलं. त्यानं आणि नातीनं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं तेव्हाही 90 मिनिटं मी माझ्या नाकाला जीभ लावली. तो व्हिडिओ इंटरनॅशनल रेकॉर्डसाठी पाठवला. 6 महिन्यांनी त्यांचं उत्तर आलं, पण नंतर मला अर्धांग वायुचा झटका आल्यामुळं माझ्यावर दोन ते तीन महिने उपचार सुरू होता, त्यामुळं मी काही महिने विश्रांती घेतली.
इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करता येतं : "मला गिनीज बुकमध्ये नोंद करायची होती. यानंतर 1 तास 3 मिनिटे बसून हे रेकॉर्ड केलं. याचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन पाठवल्यानंतर रक्षाबंधनच्या दिवशी मी रेकॉर्ड केल्याचं रेकॉर्डवाल्यांना सांगितलं. मी त्या मुलीचे आभार मानतो, तिची बातमी वाचली नसती तर मी हा रेकॉर्ड केला नसता. हा विक्रम करताना मला कोणतीही अडचण आली नाही," असं भूमकर काका म्हणाले. "प्रत्येकानं आपलं शरीर निरोगी ठेवावं आणि रोज व्यायाम करावा, कारण व्यायाम केल्यानं उत्साह निर्माण होतो. विशेष म्हणजे आपण इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करता येतं, असं भूमकर काका यांनी सांगितलं.
हेही वाचा
- 'तिगाव' लवकरच राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजारच्या पंक्तीत, पाहा व्हिडिओ - Tigaon Village Story
- पीठगिरणी चालकाची मुलगी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सराव समितीची कॅप्टन, जिद्दीने मिळाली नेतृत्वाची जबाबदारी - Yayati Gawad
- मनुस्मृतीच्या श्लोकानंतर आता अभ्यासक्रमात पेशवाईचा इतिहास? विरोधकांची सडकून टीका - Peshwa history in school