जालना Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रास्तारोको आंदोलन करण्याच्या सूचना मराठा समाजाला दिल्या होत्या. त्यानंतर ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येतंय.
एसटी बस पेटवली : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवलीये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय. अंबड तालुक्यात तीर्थपुरी येथे मराठा समाजानं एसटी बस पेटवून सरकारविरोधी आपल्या निषेध व्यक्त केलाय. दरम्यान, बसला आग लागल्याचा व्हिडिओ MSRTC नं कन्फर्म केलाय.
अंबड तालुक्यात संचारबंदी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येतंय. तसंच मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसंच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केलीय. सोमवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे.
जालना विभागातील एसटी बस रद्द : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यातील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलन पेटल्यानं जालन्याचे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरुन एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच एसटी जाळल्याच्या घटनेनंतर 'एमएसआरटीसी'च्या अंबड आगार व्यवस्थापकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. याबाबतची माहिती 'एमएसआरटीसी'नं दिलीय.
मनोज जरांगे पाटील आक्रमक : विशेष अधिवेशन घेत राज्य सरकारनं मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिलंय. त्यासाठी मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात पास करण्यात आलंय. त्यानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. ओबीसी आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. तसंच 'सगेसोयरे'संदर्भात अंमलबजावणी लवकर करण्याची मागमी करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपासलंय.
हेही वाचा -