पुणे Pooja Khedkar Property : खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दावा आता केला जातोय. पूजा खेडकर यांच्याविषयी रोज नव-नवीन खुलासे होत असल्याचंही बघायला मिळतंय. असं असतानाच आता पूजा खेडकर यांच्या संपत्तीविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
किती आहे पूजा खेडकर यांची संपत्ती : नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र असलेल्या पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांकडं तब्बल 110 एकर शेतजमीन आहे. ही मालमत्ता म्हणजे शेतजमीन कमाल मर्यादा कायद्याचं उल्लंघन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. तसंच त्यांच्याकडं 1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकान आहेत. इतकंच नाही तर 'हिरानंदानी'मध्ये त्यांचे 7 फ्लॅट्स आहेत. 900 ग्रॅम सोनं, हिरे, 17 लाख रुपये किंमतीचं सोन्याचं घड्याळ, 4 कार, दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये भागीदारी आणि एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. पूजा खेडकर यांच्याकडं 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी विचारलाय.
ऑडी कारवर 21 चलन : "पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणार आहेत. ऑडी कारवर बेकायदेशीर लाल दिवा लावणे या प्रकरणी पूजा खेडकर यांची चौकशी होणार आहे. पूजा खेडकर यांनी गाडीवर "महाराष्ट्र शासन" अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून चौकशी होणार. मोटर वाहन नियम या कायद्यांतर्गत पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार आहे. खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी २१ चलन आहेत," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी शफील पठाण यांनी दिली.
पीएमओनं मागितला अहवाल : पुण्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आलीय. पूजा खेडकर यांच्या आयएएस नियुक्तीबाबत अनेक खुलासे होत असून आता त्यांच्याबाबत पीएमओनं आणि सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीनं महाराष्ट्र सरकारकडं अहवाल मागितलाय.
कोण आहेत पूजा खेडकर ? : पूजा खेडकर या 2022 बॅचच्या आयएएस अधिकारी असून जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्यानं वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली. पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिले असून सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
हेही वाचा -