मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर झटका बसेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय. विजयाचा विश्वास नसल्याने ही निवडणूक शक्य तितकी लांबवल्याचा आरोप त्यांनी केलाय. निवडणूक लवकर होण्याची गरज होती, मात्र सरकार घाबरलेले असल्याने विलंब करण्यात आलाय. राज्यातील जनता या निवडणुकीची प्रतीक्षा करीत होती. महाराष्ट्राला बुडवण्याचे काम करणाऱ्यांना आता जनता बुजवण्याचे काम करेल, असे त्यांनी म्हटलंय. नवीन शासन निर्णय काढण्यासाठी आणि बोगस कामाचे भूमिपूजन करण्यासाठी ही निवडणूक लांबणीवर नेली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
खोकेबाज सरकारकडे प्रचंड प्रमाणात पैसे: राज्यात कायदा गुंडाळून काम केले जात असून, आज सात आमदारांचा शपथविधी करण्यात आला. खोकेबाज सरकारकडे प्रचंड प्रमाणात पैसे आहेत. प्रचंड पैसा सत्तेतून मिळवला आहे. सरकार ३० टक्के कमिशन घेत होते, त्यामुळे जनता यांना माफ करणार नाही. या निवडणुकीत मतदारांवर पैशांचा पाऊस पडेल, मात्र जनता आता त्याला बळी पडणार नाही, असा विश्वास विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीमध्ये २२२ जागांवर एकमत झाले असून, दोन दिवसांनी होणाऱ्या बैठकीत पुढील चर्चा होईल. दिल्लीत होणाऱ्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिलीय. अडीच वर्षांपासून महायुती सरकारने जो कारभार केला, त्याचा बदला घेण्याची संधी आता जनतेला मिळालीय, महाराष्ट्राला गुजरातकडे गहाण ठेवणाऱ्या भ्रष्ट महायुतीला महाराष्ट्रातील जनता या निवडणुकीत घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
जाहिराती देऊन जनतेची फसवणूक : तळं राखेल तो पाणी चाखेल या म्हणीप्रमाणे तळं राखण्याचं काम दिलेल्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. सरकारी पैशातून जाहिराती देऊन जनतेची फसवणूक करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी भाजपाला संविधानाचे स्मरण करून दिले. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचंही ते म्हणालेत.
हेही वाचा
आचारसंहितेपूर्वीच महायुतीची बाजी, राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची वर्णी, पाहा संपूर्ण यादी