मुंबई Pravin Darekar on Sanjay Raut : शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्याने सरसंघचालक मोहन भागवत त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आजही त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपाचे पॉलिटिकल एजंट म्हणून संबोधलं आहे. यावरून आता भाजपा नेते आक्रमक झाले असून तेसुद्धा संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेत आहेत. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राहुल नार्वेकर भाजपाचे पॉलिटिकल एजंट : सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचा पीक व राज्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतरसुद्धा नार्वेकरांनी घटनाबाह्य पद्धतीनं खोटा निकाल दिला, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. या प्रकरणावर बोलताना दरेकर म्हणाले आहेत की, संजय राऊत बेताल वक्तव्य करत आहेत. संविधानाने ज्या काही यंत्रणा उभ्या केल्या आहेत, त्या विधानसभा अध्यक्षांवर अशा पद्धतीने बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग आणला गेला पाहिजे; परंतु संजय राऊत यांना माहीत आहे अशा पद्धतीचं काही सणसणाटी बोललं की पब्लिसिटी भेटते आणि आपण चर्चेत राहतो. म्हणून ते दररोज अशा प्रकारे घटनेवर, देशावर, लोकशाही संदर्भामध्ये उलट सुलट वक्तव्य करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून संजय राऊत यांच्या वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
संघ ही आमची मातृ-पितृतुल्य संस्था : राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीवरसुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. त्याचप्रकारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले आहेत की, ऑर्गनायझर या नियतकालिकामध्ये जी काही भूमिका संघाने मांडली आहे त्यामुळे या भेटीचं विशेष वैशिष्ट्य वाटतं; परंतु संघाच्या सरसंघचालकांना मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते भेटत असतात. त्यांचं मार्गदर्शन घेत असतात. ही प्रक्रिया चिरंतर संघ व भाजपात सुरू आहे. त्याच स्तरावर संघाशी समन्वय साधने हा आमच्या नित्य कामकाजाचा भाग आहे. म्हणून योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत भेटत असतील तर त्यात काही विशेष आहे असं म्हणायचं कारण नाही. संघ ही आमची मातृ-पितृतुल्य संस्था आहे. म्हणून संघाचे वरिष्ठ सरसंघचालक स्वतः भेटत असतील तर त्यांना भेटून त्यांच्याशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे, असंही दरेकर म्हणाले.
हेही वाचा:
- ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला, पोलिसांच्या भूवया उंचावल्या - Ravindra Waikar
- "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र झाला असता"; 400 पारच्या नाऱ्यावर भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य - T Raja Singh Statement
- आदित्य ठाकरेंची 'एनडीए' सरकारबाबत मोठी भविष्यवाणी; निवडणूक आयोगावरही हल्लाबोल - Aaditya Thackeray On NDA