सोलापूर Praniti Shinde : प्रणिती शिंदे सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहेत. काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे गावभेट दौऱ्यावरुन परत येत असताना त्यांच्या चारचाकीवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावाच्या बाहेर ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. सरकोली गावात भगीरथ भालके यांची भेट घेऊन परत जाताना रात्रीच्या अंधारात निर्जनस्थळी हल्ला झाला. प्रणिती शिंदेंच्या चारचाकीला अडवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काही जणांनी चारचाकीची तोडफोडही करण्याचा प्रयत्न केला. चारचाकीत बसलेल्या प्रणिती शिंदेदेखील प्रचंड संतापलेल्या अवस्थेत होत्या.
प्रणितींना राग अनावर; गाडीप हात लावाल तर याद राखा : हल्ल्यामुळं संतप्त झालेल्या काँग्रेसच्या आमदार व सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे चारचाकी बाहेर आल्या. त्यांनी बाहेर येऊन वाहनाला हात लावायचा नाही, असा इशारा दिला. सरकोली गावात प्रणिती शिंदेंची शाब्दिक चकमकदेखील झाली. सोलापुरात आल्यानंतर प्रणिती शिंदेनी माध्यमांना माहिती दिली. त्या म्हणाल्या, " हल्ला करणारे लोक भाजपाचे होते. कुणी आंदोलक नव्हते".
प्रणिती शिंदेंसमोर मराठा बांधवांनी दिले गो बॅकचे नारे : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेल्या प्रणिती शिंदे या गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर होत्या. पंढरपूर तालुक्यातील चळे गावात ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा करत असताना मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा बांधवांकडून घोषणा देण्यात आल्या. संयम बाळगून प्रणिती शिंदे या मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजी ऐकत होत्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मराठा बांधवांना रोखण्याचा प्रयत्न केला. प्रणिती शिंदे गो बॅकचे नारे देत पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आम्ही मराठा समाज बांधवांच्या बाजूनं- प्रणिती यांच्यासोबत चारचाकीत बसलेल्या योगेश जोशी यांनी माहिती देताना सांगितलं, "हे मराठा आंदोलक नव्हते. हे कुणाच तरी राजकीय षडयंत्र आहे. कारण महाविकास आघाडीचे सर्वच नेते मराठा समाज बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत आहेत. मग हे दुसरे कुणी तरी विरोधक होते. निर्जनस्थळी चारचाकी अडवून असा हल्ला करण्याचा प्रयत्न करणं, हे बरोबर नाही. आम्ही मराठा समाज बांधवांच्या बाजूनं आहोत, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा :