मुंबई Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना वंचितच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. शिवेसेनेनं आठमुठेपणाची भूमिका घेतली. त्यामुळे किमान आपण बसून जागा अंतिम करू, अशी विनंती वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून जागावाटपाबाबत निर्णय घेण्याची विनंती केली.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे वंचितला वाट्याच्या जागा आणि स्थान लक्षात येत नाही. याबाबत सातत्याने विनंती करूनही तिढा सोडवला जात नाही, अशी नाराजी प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. "सारे काही आलबेल असल्याचं संजय राऊत खोटे बोलतात. आलबेल तर १० जागांची नावे राऊत यांनी जाहीर करावी, असे आंबेडकर यांनी म्हटले. राऊत हे माध्यमांकडं खोटी माहिती देत आहेत," असा आरोपदेखील आंबेडकर यांनी केला.
चेन्निथला यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा- महाविकास आघाडीतील नेत्यांनी वंचितच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी जागावाटपाबाबत शिवसेना 18 जागांवर अडून बसली आहे. त्यामुळे जागावाटप पुढे सरकू शकत नसल्याचं सांगितलं, असेही आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
कॉंग्रेस आणि वंचितनं एकत्र बसण्याची गरज- यासंदर्भात आंबेडकर यांनी खर्गे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "त्यांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यांना वेळ घेऊ द्या. ज्या जागा कॉंग्रेसच्या डोक्यात आहेत आणि कॉंग्रेस ज्या जागांवर दावा करते आहे, त्या जागांवर चर्चा करण्यासाठी आपण एकत्र बसले पाहिजे. मला आशा आहे की, यासंदर्भात आपण लवकरच एकत्र बसू. जागावाटपावर सकारात्मक चर्चा करून अंतिम तोडगा काढू, असेही आंबेडकर यांनी या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-