मुंबई : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला असून, (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी आणि महायुतीमधील राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेने देखील आज 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीवरून काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून ईशान्य मुंबईची जागा राखी जाधव यांना देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत केली. याविषयी जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी बैठकीत नव्हतो, त्यामुळे याविषयी आपल्याला जास्त माहिती नाही. आज काही जागा जाहीर केल्या जाऊ शकतात असं देखील ते म्हणाले. भिवंडीच्या जागेवर चर्चा सुरू आहे. तसंच, जागा वाटप हा विषय शरद पवार यांच्या स्तरावर असल्याचंही ते म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती : वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केल्याने आपण महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यासोबतच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची देखील काल उशिरा भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती की, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुसस्कर्ते आहात, तुमचं आंबेडकरी विचारांशी रक्ताचं नातं आहे आणि आमचं विचारांचं नातं आहे. त्यामुळे जेव्हा रक्त आणि विचार एकत्र येतात तेव्हा आपण कोणालाही थोपवू शकू. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा असं आवाहन केलं आहे.
शत्रू सोबत लढायचं असेल तर एक पाऊल पाठीमागे घ्यावा लागतं : जितेंद्र आव्हाड म्हणाले, की माझी भूमिका मांडली. त्यांच्या लक्षात येते की नाही हे मला माहीत नाही. कारण, की ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. तसंच, पेशाने वकील देखील आहेत. त्यांच्या रक्तात आंबेडकरांचं रक्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी आपण बोलणं योग्य होणार नसल्याचं आव्हाड म्हणाले. शत्रू सोबत लढायचं असेल तर एक पाऊल पाठीमागे घ्यावं लागतं. त्याप्रमाणे आंबेडकरांनी विचार करावा असंही ते म्हणाले आहेत. महाविकास आघाडातील जागा वाटपातील तिढा सुटेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.