पाथर्डी Pomegranate Export To Australia : उसा बरोबरीनं आता डाळिंब उत्पादनातही अहमदनगर जिल्हा अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील संतोष पन्हाळे या शेतकऱ्याच्या डाळींबाला थेट मलेशियातून मागणी आली होती. तर आता पाथर्डी तालुक्यातील कल्पा खक्कर या शेतकरी महिलेचे डाळिंब थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.
एका डाळिंबाचं वजन 225 ग्रॅम : पाथर्डी तालुक्यातील रेणुकाआई वाडी येथील कल्पा खक्कर या शेतकरी महिलेनं आपल्या 60 एकर क्षेत्रात 2012 साली भगवा जातीच्या डाळिंब रोपांची 14×8 फुटावर लागवड केली. यावर्षी बागेला फळ लागले असून एका फळाचं वजन साधारणत: 225 ग्रॅम आहे. तर 270 प्रति किलो भावानं 5 टन डाळिंब मालाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली असल्याची माहिती कल्पा खक्कर यांनी दिलीय.
ऑस्ट्रेलियन बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न : खक्कर यांची डाळिंबे ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या फाईन फुड ऑस्ट्रेलिया या प्रदर्शनामध्ये अपेडामार्फत प्रदर्शित केली जाणार आहेत. त्याद्वारे तेथील स्थानिक ग्राहकांना आकर्षित करून भारतीय डाळिंबासाठी ऑस्ट्रेलियन बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. भारतीय डाळिंबांनी ही बाजारपेठ काबीज केल्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं के.बी. एक्सपोर्टचे संचालक कौशल खट्टर म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी अभिमानास्पद क्षण : राज्यातील शेतकऱ्यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियासाठी पाठविणे हा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. त्यामुळं इतर निर्यातदारदेखील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरून ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यातीसाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक कदम यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -
- कष्टाचे झाले चीज! अहमदनगरच्या शेतकऱ्याची मेहनत फळाला, डाळिंब पोहोचली थेट मलेशियात! - Pomegranate Farmer Success Story
- शेतीतूनच शोधला जीवनाचा सुखकर मार्ग; डाळिंबाची शेती करत खडकाळ माळरानाचं केलं नंदनवन - Pomegranate Farming
- तरुण शेतकरी बंधूंची किमया; संगमनेरचं डाळिंब पोहचलं थेट आखाती देशात, दीड एकरात 12 लाखांचं उत्पन्न - Pomegranates Farming