मुंबई Mumbai Police Defamation Case : मुंबई पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर ८ जानेवारीला एक पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं होतं. पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस कॉन्स्टेबल यांनी मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील आठ महिला पोलिसांवर बलात्कार केल्याचा आरोप या पत्रात केला गेला. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस दलातील कथित अत्याचाराच्या व्हायरल पत्राचा तपास गुन्हे शाखा करत आहे. आतापर्यंत १९ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणात तीन आरोपींचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामधील दोन पोलीस कॉन्स्टेबल फरार होते. त्यातील एक पोलीस कॉन्स्टेबल मुंबईत आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच एक खासगी व्यक्तीचादेखील पत्र दादर पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचवण्यात हात असल्याची माहिती समोर आली आहे.
या कलमांनुसार गुन्हा दाखल: नागपाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 500, 506, 509, 465 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या आठ महिला कॉन्स्टेबल यांच्या नावे लिहिलेल्या “बनावट पत्रा”ची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली. सोशल मीडियावर लीक झालेल्या एका पत्रात पोलीस उपायुक्त आणि मोटार वाहन विभागाच्या दोन पोलीस निरीक्षकांवर बलात्कार, लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. चुकीचा तपशील लिहून तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणात आठ महिलांची बदनामी करण्यात आली. त्यांचादेखील जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच एका पोलीस कॉन्स्टेबलचादेखील जबाब काल नोंदवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे साक्षीदारांसह अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
महिला कॉन्स्टेबल गर्भवती राहिल्याचा पत्रात उल्लेख: जानेवारीमध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या तीन पानांच्या पत्रात तीन अधिकाऱ्यांनी आठ महिला कॉन्स्टेबल यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर काही कॉन्स्टेबल गर्भवती राहिल्याचेही या पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिता कदम या करत आहेत. अद्याप तपास सुरू असल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा: