मुंबई Dadar Railway Station : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारं तसंच वर्दळीचं स्थानक म्हणूनही दादर रेल्वे स्थानकाची (Dadar railway station) ओळख आहे. दररोज लाखो प्रवासी येथून प्रवास करतात. मात्र, एका अज्ञात व्यक्तीनं कॉल करत दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली. परंतू हा कॉल फेक असल्याचं काही वेळानं उघड झालं.
आरोपी अटकेत : दादर रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी 112 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉलनं देण्यात आली होती. दादर रेल्वे स्थानकावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळं हा धमकीचा कॉल येताच एकच खळबळ उडाली. धमकीचा कॉल येताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तातडीनं बीडीडीएस पथकासह दादर रेल्वे स्थानकावर कसून तपासणी केली. मात्र, कुठंही कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. दरम्यान, हा धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीचाही पोलिसांनी शोध घेतलाय.
पोलिसांनी दिली माहिती : बॉम्ब ठेवून दादर आणि कल्याण रेल्वे स्थानक उडवून देणार अशी धमकी देणाऱ्या आरोपीस अटक करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलंय. विकास उमाशंकर शुक्ला (वय- 35) असं आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.
असा आहे घटनाक्रम : 29 मार्चला रात्री 11 वाजेच्या सुमारास अनोळखी मोबाईल नंबरवरुन मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूम क्रमांक 112 येथे कॉल करुन दादर रेल्वे स्थानक व कल्याण रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेवून रात्रपाळीचे अधिकारी, अंमलदार तसंच गुन्हे प्रकटीकरण पथकास पेल्हार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सूचना देवून धमकीचा कॉल करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकानं पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत बिलालपाडा, धानिवबाग, वनोठापाडा याठिकाणी आरोपीचा शोध घेतला. तसंच तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरुन आरोपी विकास उमाशंकर शुक्ला याला अटक करण्यात आली.
बायकोला अद्दल घडवण्यासाठी केला कॉल : तपासादरम्यान आरोपीनं सांगितलं की, तो मजुरीचं काम करतो. दीड वर्षांपूर्वी त्याची बायको त्याला सोडून कल्याण येथे रहायला गेली होती. ती कामानिमित्त कल्याण ते दादर असा प्रवास करत होती. त्यामुळं बायकोला धडा शिकवण्यासाठी त्यानं कल्याण आणि दादर रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. तसंच हे सगळं त्यानं दारुच्या नशेत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी विकास शुक्ला विरुद्ध पेल्हार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 505(1) (ब), 505 (2), 182 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Major Vasant Jadhav : कुणी मेडल देतं का मेडल! हजारोंचे प्राण वाचविणारा 31 वर्षे उपेक्षित, निवृत्त मेजरची सरकारकडं आर्तहाक
- मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त घराबाहेर पडताय; कोणत्या मार्गांवर असेल मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
- महापरिनिर्वाण दिन; बाबासाहेबांच्या अनुयायांच्या सेवेसाठी महानगरपालिका सज्ज, 6 डिसेंबरला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर