मुंबई : उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'कटेंगे तो बटेंगे' असा नारा दिला होता. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचाराचं रणशिंग फुकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी, 'एक है तो सेफ है' असा नवा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षानं देशात दलित आणि इतर मागासवर्गीयात भांडणं लावली. आदिवासी नागरिकांचे अधिकार हडपले, असा जोरदार हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीनं महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. केवळ लोकांना लुटणं हेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ध्येय आहे. ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी महाविकास आघाडीचा वाद सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी त्यांनी महायुतीनं रेकॉर्डब्रेक कामं केल्याचा दावाही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रचाराचा धुरळा उडवला, यावेळी ते बोलत होते.
राज्यातील जनतेची लुट : महाविकास आघाडीवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्राेचं काम रखडवलं, समृद्धी महामार्गाच्या बांधकामात अडथळे निर्माण केले. राज्यातील जनतेचं भविष्य उज्वल करणाऱ्या प्रत्येक योजना महाविकास आघाडीच्या लोकांनी बंद पाडल्या. पण जनतेच्या आशीर्वादामुळं येथं महायुतीचं सरकार स्थापन झालं. अडीच वर्षात महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं विकासाचे नवे विक्रम रचलेत.
लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न : "विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी महिलांचं जीवन सुसह्य करणं आणि त्यांना सक्षम करणं खूप महत्त्वाचं आहे. महिलांमुळं समाजाची प्रगती झपाट्यानं होते. त्यामुळं गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं महिलांना केंद्रस्थानी ठेवून मोठे निर्णय घेतले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी आमचं सरकार उचलत असलेली पावलं काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला सहन होत नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात होत आहे. काँग्रेस ही योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
हेही वाचा