नागपूर : Ramtek Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आता अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडल्यानंतर आता नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नागपूर जिल्ह्यात होऊ घातली आहे. अत्यंत चुरशीची लढत होत असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या कन्हान येथे ही जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. सभा होणार असलेल्या ठिकाणचा संपूर्ण परिसर हा सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी आणि चौकशी केली जात आहे.
गडकरी, पारवेचा प्रचारार्थ मोदी मैदानात : नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक येथील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. रामटेक मतदारसंघात शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध श्याम बर्वे अशी थेट लढत होणार आहे. तर, नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात सरळ लढत होत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक येथे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले होते.
मोदी सभेनंतर वातावरण बदलतं : "नरेंद्र मोदीं यांच्या सभेनंतर मतदारसंघात वातावरण बदलत असतं. महाराष्ट्रात एनडीएला अनुकूलता आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर अनुकूलता आणखी वाढेल, " असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
योगीच्या सभांमधून वातावरण निर्मिती : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा भाजपने प्रचारासाठी विदर्भाच्या मैदानात उतरवलं आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचपैकी वर्धा, नागपूर आणि भंडारा या तीन मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्यातदेखील योगी आदित्यनाथच्या सभांचा धडाका सुरू राहणार आहे.
पाऊसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता : नागपूर, रामटेक, वर्धा यासह पूर्व विदर्भात सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रामटेक येथील सभेत पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामीण पोलिसांची जड वाहतुकदारांसाठी अधिसूचना : नागपूर ग्रामीण घटकातील पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत लोकसभा निवडणुक 2024 संदर्भाने रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार राजू परावे यांचे प्रचारार्थ स्थळ बुक बॉन्ड मैदान कन्हान शहर येथे (दि. १०.०४.२०२४)रोजी वेळ १५.०० वा. नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी रामटेक लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहरकडे जाणारा रस्ता हा कन्हान शहरातून जात असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या जड, अवजड आणि इतर वाहनांची संख्या जास्त प्रमाणात आहे. कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले स्थळ हे कन्हान शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असल्यानं वाहतूकीची कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दि. १०.०४.२०२४ चे दुपारी १२.०० वा. पासुन ते दि. १०.०४.२०२४ चे २१. ०० वाजता पर्यंत सर्व प्रकारचे जड, अवजड आणि इतर वाहनांना मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहराकडे जाण्यास प्रवेश बंद असणार आहे.
पर्यायी व्यवस्था म्हणून खालील मार्ग दिला : ब्रुक बॉन्ड मैदान कन्हान शहर येथील नरेंद्र मोदी यांचे प्रचार सभेनिमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहर हददीपर्यंत दिनांक १०/०४/२०२४ चे दुपारी १२.०० वा. पासून ते दि. १०.०४.२०२४ चे २१.०० वाजता पर्यंत सर्व प्रकारच्या जड, अवजड आणि इतर वाहन वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. तसंच, पर्यायी व्यवस्था म्हणून खालील मार्ग वाहनांच्या वाहतुकीकरिता उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्ग क. ४४ मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहराकडे जाणारी वाहतुक आमडी फाटा-पारशिवनी -भानेगाव- खापरखेडा-दहेगाव रंगारी-कोराडी नागपूर शहर हद्दीपर्यंत बंद राहणार आहे. हे वाहतुकीचे नियम १०/०४/२०२४ दुपारी १२.०० वाजल्यापासून ते दि. १०.०४.२०२४ च्या रात्री नऊ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
हेही वाचा :