ठाणे Pizza Delivery Boy Death : ठाण्याच्या गांधीनगर भागातील नळपाडा येथील आणि वर्तकनगर हद्दीत असलेल्या एका पिझ्झाच्या कार्यालयात काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास घडलीय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महेश अनंत कदम असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आलीय, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
साफसफाई करताना शॉक लागून मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार मृतक महेश अनंत कदम हा साईसेवा सोसायटी, शिवाजी नगर, राबोडी, ठाणे इथं आईसह राहत होता. मृतक महेश हा कुटुंबातील एकटा कमवता होता. तो वर्तकनगरमधील पिझ्झा दुकानामध्ये मंगळवारी रात्रपाळीला कामावर गेला. बुधवारी पहाटे घरी जाण्यापूर्वी त्याला पिझ्झा शॉप सफाईचं काम देण्यात आलं होतं. मात्र पहाटे प्रेशर पाण्यानं सफाई करताना विद्युत केबलचा शॉक लागून महेशचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांनी केली आकस्मित मृत्यूची नोंद : या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी चौकशी करत मृत्यूची नोंद केली असून, कुटुंबाच्या माहितीनुसार पुढं गुन्हा दाखल केला जाईल, असं वर्तकनगर पोलिसांनी सांगितलंय. मात्र, "या संपूर्ण प्रकारानंतर भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊ नये आणि झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करुन त्यांना जाब विचारला जाईल," असं मनसे नेते पुष्कराज विचारे यांनी सांगितलंय.
आता पुन्हा कोणाचा मृत्यू नको : या अपघाती मृत्यूनंतर पीडिताच्या कुटुंबीयांनी अशा प्रकारच्या घटनांमध्ये कुठल्याही गरीबाचा मृत्यू होऊ नये, यासाठी सर्वच लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरुन असा अपघात होणार नाही आणि कुठल्याही कुटुंबाचा दिवा विझणार नाही, असं आवाहन पीडित कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी केलंय. ज्यांची चूक आहे, त्यांच्यावर ती कठोर कारवाई झाली पाहिजे, असंही म्हणत पीडिताच्या कुटुंबीयांनी न्याय देण्याची मागणी केलीय.
हेही वाचा :