मुंबई Mumbai High Court News : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विजयावर आक्षेप घेऊन ईव्हीएमवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता ईव्हीएमसंदर्भात दिशाभूल करणं आणि एकांगी प्रतिक्रिया देऊन संशय निर्माण केल्या विरोधात लोकसभेतील कॉंग्रेस नेते राहुल गांधी, उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि युट्यूबर ध्रुव राठी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं ईव्हीएमविषयी बोलणं भोवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, या खंडपीठासमोर ही याचिका चुकीनं सूचीबद्ध झाल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिली. त्यामुळं ही याचिका योग्य त्या खंडपीठाबरोबर सुनावणीसाठी समोर ठेवण्यात यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले.
याचिकेत काय म्हटलंय : विविध सोशल मीडियावर ईव्हीएमसंदर्भात करण्यात आलेल्या पोस्ट तत्काळ काढण्यात याव्यात, असे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय. उत्तर पश्चिम मुंबईतील निवडणुकीदरम्यान विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांच्या कार्यकर्त्यांनी, निकटवर्तीयांनी मोबाईल ओटीपीचा वापर करून ईव्हीएम मशीन हॅक केली, अशा स्वरूपाचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांच्या मताधिक्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावर विजय मिळवला होता. मतमोजणीवेळी मतमोजणी केंद्रात वायकर यांच्या कार्यकर्त्यानं मोबाईलवरील ओटीपीच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक करण्यासाठी प्रयत्न केल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, ध्रुव राठी यांनी ईव्हीएम विरोधात थेट संशय व्यक्त केला होता.
हेही वाचा -