मुंबई Lok Sabha Election 2024 : मागील अनेक दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.
चर्चांना आता पूर्णविराम : भाजपाकडून आज २३ लोकसभा निवडणूक निरीक्षकांची घोषणा केली गेली आहे. यामध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड तर गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपाकडून घोषित करण्यात आलेल्या या यादीमुळे राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यांना किंवा नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. २९ फेब्रुवारीला दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या जवळपास १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षकांची करण्यात आलेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
विद्यमान खासदाराबरोबर दोन पर्यायी उमेदवार: यापूर्वी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवण्याची चर्चा होती. राज्यातील एकूण लोकसभा मतदारसंघांपैकी चंद्रपूर हा एकमेव लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. यापूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघातून गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा होती. नेहमी निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळेल, या आशेनं असलेल्या आणि आताच राज्यसभा निवडणुकीतसुद्धा पत्ता कट केलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनाही यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची चर्चा होती. परंतु, या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक पदी नेमणूक केल्यानं आता यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार: भाजपाच्या निरीक्षकांना आता त्यांना देण्यात आलेल्या लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि त्याला पर्याय म्हणून दोन उमेदवारांची नावे दिल्ली हायकमांडला द्यायची आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार, अशा पद्धतीची वक्तव्य यापूर्वी पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार या सर्वच नेत्यांनी केली आहेत. निरीक्षक पदाची जबाबदारी असल्यानं त्यांना राज्यातच जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच: पुढील महिन्यात कुठल्याही क्षणी अठराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. २९ फेब्रुवारीला भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर एक-दोन दिवसात लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी घोषित होण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेशही असणार आहे. तसेच देशभरातील लोकसभेसाठी भाजपाकडून पहिल्या यादीत १०० उमेदवारांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये शाश्वत जागांचा समावेश असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा: