मुंबई Shivacharitra Ek Soneri Paan song: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा भाग म्हणून 'शिवचरित्र - एक सोनेरी पान' या गीताचे लोकार्पण ज्येष्ठ गायक संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत "हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले" या पंक्तींप्रमाणे अवस्था आज आपल्या हृदयाची आहे. तसंच लतादीदींची आठवण सतत हृदयात व्यापून असते अशा कौतुकाच्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. दीपक वझे यांनी लिहिलेले, गायक आणि संगीतकार रुपकुमार राठोड यांनी संगीतबद्ध केलेले तसंच गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेल्या 'शिवचरित्र - एक सोनेरी पान' या गीताचे लोकार्पण बुधवारी सांताक्रुझ येथील आजिवसन हॉलमध्ये करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, रूपकुमार राठोड, कौशिकी चक्रवर्ती, सुरेश वाडकर, पद्मा वाडकर, नितीन मुकेश, आदिनाथ मंगेशकर, आयआरबीच्या संचालिका दीपाली म्हैसकर, डॉ. दीपक वझे, डॉ. गौरी वझे, डॉ. प्रताप पानसरे, डॉ. ईशा पानसरे, क्षितिज दाते, सुनाली राठोड, निसर्ग पाटील, मयुरेश पै, पुष्कर श्रोत्री, सीआयडी अंशा सैय्यद, नरेंद्र गुप्ता, भवदीप जयपुरवाले, रिॲलिटी शोतील दिग्गज मुकेश परमार, संगीतज्ञ शशी व्यास आणि डॉ. अरविंद पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या आठवणी शेअर केल्या, जसे की ताजमहल येथील किस्सा त्यांनी सांगितला. "त्या दिवशी, ताज आणि दीदी दोघेही एकमेकांच्या सौंदर्याने प्रभावित झाले होते. रात्रीच्या वेळी ताजमहाल परिसरात फिरत असताना मी दीदीला 'कही दीप जले कहीं दिल' हे गाणं गायला सांगितलं. दीदी गात असतानाच तिथे मौलवी धावत आले. येथे गाणं गाऊ शकत नाही असं सांगण्यास येणारा मौलवी देखील त्यांना गाण्याची विनंती करु लागला."
डॉ. दीपक वझे यांनी कवितेला मंगेशकर कुटुंबीयांचा आशीर्वाद लाभल्यामुळे आनंद व्यक्त केला. रूपकुमार राठोड यांनी या प्रकल्पाशी असलेले आपले भावनिक संबंध व्यक्त केले, "महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. आदिनाथने मला 'शिव चरित्र' गीत संगीतबद्ध करण्यास सांगितलं. तेव्हा मला खूप अभिमान वाटला, आणि मी त्वरित होकार दिला. हे गाणं अप्रतिम झालं, आणि आम्हा सर्वांना ते खूप आवडलं."
कौशिकी चक्रवर्ती यांनी वीर रसाच्या गाण्याच्या सादरीकरणासाठी निवड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी उत्तर दिलं की, वीर रस स्त्रियांना शोभतो, कारण त्यांच्यात खरी शक्ती असते, आणि लतादीदींना सर्व रस शोभायचे. उषाताई मंगेशकर यांनी म्हटले की, कौशिकीचं शक्तिशाली सादरीकरण नक्कीच शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यास अनुरूप होते.
हृदयनाथ मंगेशकर यांनी जाहीर केले की, ते आपल्या प्रिय बहिणीच्या आठवणींवर आधारित 'श्री शारदा विश्व मोहिनी' लता मंगेशकर नावाचं पुस्तक लिहित आहेत. शिव चरित्र कार्यक्रमात कौशिकी चक्रवर्तीच्या गाण्यासह अनेक सादरीकरणे झाली आणि निसर्ग पाटील यांच्या "शिव स्तुति" ने समारोप झाला. शिवचरित्र - एक सोनेरी पान ' हे गीत YouTube वरील एलएम (LM)म्युझिक चॅनलवर पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.
हेही वाचा