नागपूर Gold Smuggling Nagpur Airport : नागपूर कस्टम्स एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटनं नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) सोन्याच्या तस्करीचा भांडाफोड केलाय. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलीय. यात 822 ग्रॅम सोन्याच्या पेस्टसह 5 आयफोन, 7 महागडे घड्याळं आणि 8 किलो केशर जप्त करण्यात आलंय. कस्टम विभागानं हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, तस्करी प्रकरणात एका प्रवाशाला अटक करण्यात आलीय.
1 कोटी 37 लाखांचा मुद्देमाल जप्त : मोहम्मद मोगर अब्बास असं अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचं नाव आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 1 कोटी 37 लाख रुपये इतकी आहे. कस्टम विभागाचे आयुक्त संजय कुमार आणि कस्टम विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आलीय. कस्टम अधिकाऱ्यांना अत्यंत गोपनीय माहिती समजली होती की, एअर अरेबिया फ्लाइट क्र. G9-415 विमानानं शारजाहून नागपूरला येत असलेला एक प्रवासी सोन्याच्या पेस्टसह महागडे मोबाईल आणि घड्याळं तस्करी करत आहे. माहितीच्या आधारे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी शारजाहून येणारी फ्लाइट G9-415 नागपूर विमानतळावर उतल्यानंतर संशयित व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केलं होतं.
संशयास्पद व्यक्तीवर लक्ष केंद्रित : एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्याला चौकशीसाठी थांबण्यात आलं. त्यावेळी त्याच्याकडं पँट आणि बनियानच्या आत सोन्याची पेस्ट आढळून आली. कुणालाही संशय येऊ नये याकरिता अत्यंत सुबकपणे पँटची शिलाई करण्यात आली होती. सोन्याच्या तस्करीचा हा एक नवीन प्रकार आता समोर येतोय.
1 कोटी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : जप्त करण्यात आलेल्या सोन्याचं वजन 822 ग्रॅम इतकं असून त्याची किंमत 50 लाख 75 हजार 133 इतकी आहे. तर याशिवाय 5 लाख 92 हजार 672 रुपये किंमतीचे 5 आयफोन 15 प्रो मॅक्स, 3 लाख 11 हजार 422 रुपये किंमतीच्या अँपल, स्मार्ट घड्याळं आणि 77 लाख 28 हजार 448 रुपये किंमतीचे आठ किलो केशर जप्त करण्यात आलंय.
हेही वाचा -
- बेल्टमध्ये लपवून सुरू होती सोन्याची तस्करी; 1 किलो 700 ग्रॅम सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावर जप्त
- Gold Smuggling Case Mumbai: 'डीआरआय'ने सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा केला पर्दाफाश, ७ किलो सोने जप्त
- Gold Smuggling : सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; १९ कोटींचे सोनं जप्त, वाराणसी, नागपूर व मुंबईत झाली कारवाई