चंद्रपूर CET Centre in Chandrapur : चंद्रपुरात सीईटीची ऑनलाइन परीक्षा केंद्र फार कमी आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नागपूरसारख्या ठिकाणी जावं लागत होतं. याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत होता. मात्र आता या विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार असून यासाठी राज्यातील सर्वात प्रशस्त आणि मोठं सीईटी परीक्षा केंद्र उभारण्यात आलंय. इथं एकाच वेळी 200 विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात हे केंद्र उभारण्यात आलंय.
राज्यातील सर्वात मोठं सीईटी परीक्षा केंद्र : CET (Common Enterece Test) च्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. यात बारावी आणि पदवीनंतरच्या परीक्षांचा समावेश आहे. सोबत तंत्रशिक्षणचाही यात समावेश आहे. या परीक्षेत हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी सहभागी होतात. मात्र, ही परीक्षा आता ऑनलाइन होते. त्यासाठी आवश्यक कंप्युटर असलेले केंद्र फार कमी आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांचे इतर ठिकाणी नंबर लागतात आणि यात त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. सोबत त्यांचा वेळही यात जातो. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय सीईटी केंद्र तयार करण्यात येत आहेत. सीईटी सेल आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हे सीईटी केंद्र तयार करण्यात आले आहे. राज्यात केवळ कराड आणि चंद्रपूर या दोनच केंद्रांची क्षमता ही 200 अत्याधुनिक कंप्युटरची आहे. इतर ठिकाणी जास्तीत जास्त 100 आसन क्षमता आहे. त्यामुळं चंद्रपूर येथील केंद्र हे राज्यातील सर्वात मोठया सीईटी केंद्रांपैकी एक आहे.
सात हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा : हे सीईटी परीक्षा केंद्र सुरु झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 7 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय. यात सहा हजार विद्यार्थी हे बारावीचे तर एक हजार विद्यार्थी हे इतर शाखेचे आहेत. तसंच याचा उपयोग हा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम शिकविण्यासाठी देखील होणार आहे. यात पायथॉन प्रोग्राम, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग प्रोग्रॅम अशा अनेक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
हेही वाचा :