सातारा : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीनं भरवलेल्या कृषी, औद्योगिक प्रदर्शनात जातीवंत जनावरं शेतकऱ्यांचं आकर्षण ठरली. गडहिंग्लजमधील मुऱ्हा जातीचा सव्वा टनाचा रेडा आणि जतच्या खिलार सोन्या बैलानं सर्वांचं लक्ष वेधलं. तसंच जातीवंत जनावरांच्या स्पर्धेतही बाजी मारली.
युवराज, सोन्यानं गाजवली प्रदर्शनं : गेल्या तीन दिवसांपासून कराडमध्ये यशवंत कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्यातील हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) गावातील स्वप्नील पोवार यांचा सव्वा टनाचा मुऱ्हा जातीचा धिप्पाड रेडा शेतकऱ्यांचं आकर्षण ठरला. ३८ महिने वयाच्या या रेड्याचं नाव युवराज आहे. यापूर्वी सहा प्रदर्शनांमध्ये युवराजनं पहिल्या क्रमाकांचं बक्षीस पटकावलेलं आहे. कराडच्या प्रदर्शनातही युवराज पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला.
युवराजचा खुराक पैलवानासारखा : स्वप्नील पवार यांनी हरिणायातून म्हैस खरेदी केली होती. म्हशीबरोबर चार दिवसांच्या रेड्यालाही आणलं होतं. तेव्हापासून त्याला पौष्टीक खुराक देऊन त्याचं संगोपन केलं. त्याचं युवराज, असं नामकरण करण्यात आलं. गोळी, सरकी पेंड, हरभरे, रताळी, गाजरं, असा त्याचा खुराक आहे. युवराजला २५ लाखाला मागणी आली होती. पण, आम्ही त्याला विकलं नाही, असं स्वप्नील पवार यांनी सांगितलं.
उमराणीच्या सोन्याची वार्षिक कमाई ३५ लाख : जत तालुक्यातील उमराणी गावच्या विद्यानंद चन्नाप्पा आवटे यांच्या खिलार जातीच्या सोन्या बैलानंही शेतकऱ्याचं लक्ष वेधलं. जातीवंत खिलार बैलाच्या स्पर्धेतही त्यानं पहिला क्रमांक पटकावला. साडेसहा फूट उंच आणि साडेनऊ फूट लांबीच्या धिप्पाड सोन्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह तरुणांना आवरला नाही. खिलार जातीमधील हा सर्वात उंचीचा बैल आहे. त्याला रोज ३ डझन केळी, दिवसातून पाचवेळा हिरवा चारा, मक्याची ४० कणसं, असा खुराक दिला जातो. त्याच्या रेतनातून वर्षाला ३० ते ३५ लाखांचं उत्पन्न मिळतं. या बैलापासून पैदास झालेल्या वासरांना लाखो रुपयांची मागणी असते, असं विद्यानंद आवटे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- जिवा-शिवाच्या बैलजोडीवर चढला शृंगारी साज, कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर बैलांची सवाद्य मिरवणूक - Bendur Festival Kolhapur
- Kolhapur Diwali Padwa : कोल्हापूरकरांनी जपलीय पाडव्यानिमित्त म्हशींना नटवून पळवण्याची अनोखी परंपरा
- Agricultural Exhibition In Solapur, कृषी प्रदर्शनात एक कोटींचा गजेंद्र रेडा, पाहा व्हिडिओ