पुणे (भीमाशंकर) Mahashivratri 2024 : आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या औचित्यानं रात्री बारा वाजता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यात आली. यावेळी रुद्राभिषेक करून महाशिवरात्र उत्सवास सुरुवात झाली. प्रसंगी भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.
राज्याला सुख समृद्धी मिळण्यासाठी प्रार्थना : 'हर हर महादेव', 'ओम नमः शिवाय', 'बम बम बोले' अशा नामस्मरणाने भिमाशंकर मंदिर परिसर दुमदुमले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते भीमाशंकराची शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सर्व काही आलबेल व्हावे, अशी भिमाशंकर चरणी प्रार्थना केली आहे, अशी भावना मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. ते आज (8 मार्च) महाशिवरात्री निमित्त भीमाशंकर मंदिरात शासकीय पूजेसाठी भीमाशंकर मंदिरात आले होते. दिलीप वळसे पाटील यांनी विधिवत पूजाअर्चना करत महादेव चरणी राज्याला सुख समृद्धी मिळो, अशी प्रार्थना केली.
प्रशासनाची कडेकोट सुरक्षाव्यवस्था: भिमाशंकर हे भारतातील १२ जोर्तिंलिंगापैकी सहावे जोर्तिंलिंग आहे. त्यामुळे भाविकांची मोठी श्रद्धा आहे. हे मंदिर पुरातन आणि हेमांडपंथी पद्धतीचं असून मंदिरात शंकर पार्वतीचे एकत्र असलेले शिवलिंग केवळ भीमाशंकर येथेच आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
अशी आहे मंदिराची रचना : भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. या ज्योतिलिंर्गामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळन करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचं सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे.
घनदाट अरण्याने वेढले आहे भीमाशंकर : भीमाशंकर ज्योर्तिलिंग मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्यानं वेढलं गेलं आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू, म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. अशाच या पावन मंदिरात आज भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली. महाशिवरात्री असल्यानं आज भीमाशंकर मंदिरात सजावट करण्यात आली आहे.
हेही वाचा :