अमरावती Rise In Leopard Population : वनविभागाच्या वतीनं देशात दर चार वर्षांनी बिबट्यांची गणना केली जाते. याच पार्श्वभूमीवर 2022 मध्ये भारतातील एकूण 18 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या गणनेत देशात एकूण 13 हजार 874 बिबटे असल्याचं स्पष्ट झालंय. केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी देशातील बिबट्यांची संख्या जाहीर केली आहे.
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक : 2022 च्या गणनेनुसार देशात सर्वाधिक 3907 बिबट हे मध्य प्रदेशात आढळून आले आहेत. चार वर्षात मध्य प्रदेशात एकूण 486 बिबट वाढले आहेत. तर महाराष्ट्रात मागील चार वर्षांत 295 बिबटे वाढले असून सद्यस्थितीत येथे एकूण 1 हजार 985 बिबटे आहेत. इतर राज्यातील बिबट्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.
- कर्नाटक- 1 हजार 879
- आंध्र प्रदेश- 569
- तेलंगणात - 297
- तामिळनाडू - 1 हजार 070
- राजस्थान- 721
- पश्चिम बंगाल- 233
- अरुणाचल प्रदेश- 42
- आसाम- 74
- झारखंड- 51
- उत्तर प्रदेश-371
'या' चार राज्यात घटली संख्या : बिहार, उत्तराखंड, गोवा आणि केरळ या राज्यात बिबट्यांच्या संख्येत घट झाली आहे. बिहारमध्ये चार वर्षात 12 बिबटे कमी झाले असून सध्या बिहारमध्ये 86 बिबटे आहेत. तर उत्तराखंडमध्ये सध्या 652 बिबटे आहेत चार वर्षांपूर्वी येथे 839 बिबटे होते. गोव्यात देखील चार वर्षात सात बिबटे कमी झाले असून सध्या 77 बिबटे गोव्यामध्ये आहेत. केरळमध्ये चार वर्षात 280 बिबटे कमी झाले असून त्या ठिकाणी सध्या 570 बिबटे आढळून आले आहेत.
1995 मध्ये देशात 45 हजार बिबटे : भारतात चार वर्षात 1.08 टक्के बिबट्यांची संख्या वाढली. ही आनंदाची बाब असली तरी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे, त्यानुसार देशात 1995 मध्ये बिबट्यांची संख्या ही 45 हजार इतकी होती. 2014-15 मध्ये भारतात 9 हजार 710 बिबटे होते. तर 2018 मध्ये 12 हजार 852 बिबटे होते, अशी माहिती वन्यजीवप्रेमी आणि राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. तसंच ज्या भागात मानव वन्यजीव संघर्ष आहे, अशा ठिकाणी बिबट्यांसह अन्य वन्य प्राण्यांची संख्या कमी होत असल्याचंही ते म्हणाले.
संरक्षित क्षेत्रासह प्रादेशिक क्षेत्रातही व्हावी गणना : 2022 मधील बिबट्यांची ही गणना संरक्षित वनक्षेत्रातील असून, जर ही गणना प्रादेशिक वनक्षेत्रात देखील झाली तर बिबट्यांच्या संख्येत आणखी वाढ झालेली दिसेल. यापूर्वीच्या आकडेवारीनुसार मेळघाटात 149 बिबटे असल्याची नोंद आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेड या प्रादेशिक जंगलातील बिबट्यांची संख्या गणली गेली तर ही संख्या आणखी अधिक झालेली दिसेल, असं देखील तरटे म्हणाले. तसंच बिबट्यांच्या संख्येत वाढ होणं ही अतिशय आनंदाची बाब आहे. मात्र, बिबट्यांच्या वाढत्या संख्येचं व्यवस्थापन करणं देखील तितकंच महत्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -