पुणे Ajit Pawar On Assembly Election : गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र जय पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी बारामती विधानसभेतून लढणार की नाही, अशी देखील चर्चा सुरू आहे. अश्यातच अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्याबाबत अजित पवार यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. यावेळी ते म्हणाले की, "काही लोक मागणी करत असतील, तर संधी देऊ या, कारण मला तर त्याबाबत काही रस नाही. मी 7 ते आठ वेळा निवडणुका लढलो आहे. जनतेचा तसा कल असेल तर पार्लमेंटरी बोर्डमध्ये त्याबाबत विचार करू," असं यावेळी अजित पवार म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जनसन्मान यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा पुण्यात आली असून पुण्यातील सारसबाग इथल्या गणपती मंदिरात आरती करून या यात्रेला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी अजित पवार बोलत होते.
शहरात जेवढ्या बहिणी असतील मी त्यांच्याकडं जाणार : काही दिवसांवर रक्षाबंधन येत आहे. रक्षाबंधन सुप्रिया सुळे यांच्याबरोबर साजरी करणार का असं, यावेळी अजित पवार यांना विचारलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मी याबाबत मागचं बोललो आहे की माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू असून त्या दिवशी मी ज्या शहरात असेल, तेव्हा त्या शहरात माझ्या जेवढ्या बहिणी असतील, मी त्यांच्याकडं जाणार आहे. तिथं जर सुप्रिया सुळे असतील, तर मी तिला भेटायला जाणार आहे," असं यावेळी अजित पवार म्हणाले.
भिडे वाडा प्लॅन झाला फायनल : "आम्ही वेगवेगळ्या तालुक्यात जनसन्मान यात्रा घेऊन जात आहोत. आज राज्यपाल आपल्याकडं ध्वजारोहण करत असतात. मी पण तिथं उपस्थितीत होतो. या नंतर झालेल्या बैठकीत भिडे वाडा प्लॅन फायनल झाला आहे. आज ताबडतोब काम सुरू करू असं सागितलं आहे. पायाभरणी करता येईल पण तोवर काम थांबलं नाही पाहिजे, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्मारक उभं करण्याची जबाबदारी कॉर्पोरेशननं घेतली आहे, त्याला निधी देण्यात येईल. लाडकी बहीण योजना आणली आहे, आज याबाबत आनंद तसेच समाधान आहे. महिलामध्ये प्रचंड उत्साह आहे, काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. गरीब घरातील महिलांना चांगल्या योजना मदत देत आहेत," असं यावेळी अजित पवार म्हणाले.
कॅबिनेटमध्ये आहेत मतभेद ? : राज्याच्या कॅबिनेटमध्ये मतभेद आहेत, अशी चर्चा सुरू आहे. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "हे धादांत खोट्या बातम्या समोर येत आहेत. आमच्यात कुठलाही वाद नाही आणि मतभेद देखील नाहीत. आम्ही सगळे एकोप्यानं महायुती सरकार चालवत आहोत. आम्ही सगळे एकत्रित काम करत आहोत. विरोधकांकडं दुसरा मुद्दा राहिला नाही, असं कोणी करत असेल तर नाईलाज आहे. मला त्यावर बोलायचं नाही, असं यावेळी अजित पवार म्हणाले.
पुण्यातील दोन मतदार संघात जनसन्मान यात्रा : आज पुण्यातील दोन मतदार संघात जनसन्मान यात्रा जात आहे, याबाबत अजित पवार यांना विचारलं. याबाबत बोलताना ते म्हणाले की, विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढं जात आहोत. तसेच राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्याची माहिती देण्यासाठी ही यात्रा आहे. केंद्र सरकार आपल्या योजना लोकांपर्यंत घेऊन जात आहे. आम्ही कामाची माणसं आहोत. दुसऱ्या कशात आम्हाला रस नाही, असं यावेळी पवार म्हणाले.
राज्याची वित्तीय तूट 2 कोटींवर : राज्याची वित्तीय तूट 2 कोटींवर गेली आहे. यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मला राज्याचं उत्पादन कसं वाढवायचं माहिती आहे. आर्थिक बाबतीत अडचण येणार नाही. तसेच गडबड करणार नाही. नियमाच्या अधीन राहून काम करणार आहे आणि पुढे काम करत राहू," असं यावेळी पवार म्हणाले. राज्यपाल यांच्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "राज्यपाल यांच्या स्वागताला मी गेलो होतो ते साधे सरळ आहेत. ते विमान न घेता सर्व्हिस विमानानं आले. ते कोईमतुरचे आहेत, तिकडली परिस्थिती सांगत होते. मला राज्यपाल यांनी काही गोष्ठी सांगितल्या आहेत, त्या माझ्या हिताच्या आहेत," असं यावेळी अजित पवार म्हणाले.
मी कुणाच्याही सांगण्यावरून बोलत नाही : सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन माझी चूक झाली, यावर अजित पवार यांना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले की, "मी सांगितलं आहे पण तुम्ही लोकांनी त्या गोष्टीचा इतका पंचनामा केला आहे, की मला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकारच ठेवलेला नाही. मी कुणाच्याही सांगण्यावरून बोलत नाही. मी कुठंही काय बोलायचं आहे, ते ठरवून बोलत नाही. मला राज्यातील जनतेनं खूप काही दिलं असून माझ्या मनात जे येतं ते मी मांडत असतो," अस यावेळी अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :
- "दादा इज ग्रेट हे सिद्ध झालंय", अजित पवारांच्या 'त्या' विधानावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया - Sunil Tatkare
- सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा लढतीवर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, "ती माझी चूक.." - Ajit Pawar News
- खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, चिन्ह आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी - NCP Party Symbol