मुंबई Chandrashekhar Bawankule - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कोराडी येथील पाच एकर जमीन हडप केल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. त्यावरच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुलासा केला आहे. कोराडी येथे पाच एकर जमीन ही महायुती सरकारने महालक्ष्मी संस्थानाला दिली आहे, ती कोणत्याही खासगी ट्रस्टला दिलेली नाही. त्यामुळे या जागेचे विरोधकांनी राजकारण करू नये, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच एकर जमीन हडपल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे, त्याच पार्श्वभूमीवर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
देवाला दिलेल्या जमिनीचं राजकारण : खरं तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर येथील कोराडी जवळील पाच एकर जमीन देवस्थानच्या नावाखाली हडपल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर करण्यात येतो आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोध असतानाही ही जमीन बावनकुळे यांना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, ही जमीन महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टला दिली आहे. जे लोक निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी या देवीच्या पायावर डोकं ठेवतात, त्यांनीच आता अशा पद्धतीने देवाला दिलेल्या जमिनीचं राजकारण सुरू केलं आहे हे अत्यंत चुकीच आहे. ही जमीन माझ्या कुठल्याही खासगी ट्रस्टला दिलेली नाही, तर देवस्थानला मिळालेली आहे आणि ती देवस्थानाचीच जमीन होती, असा दावाही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
संजय राऊत यांना खोटारडेपणाची शिक्षा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने मेधा सोमय्या अब्रुनुकसानीप्रकरणी 15 दिवसांची कैद आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत हे नेहमी खोटारडेपणा करीत असतात. उटसूट कोणाचाही अपमान करणाऱ्या संजय राऊत यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे आणि न्यायालयाने दिलेली शिक्षाही स्वीकारलीच पाहिजे, तसेच त्यांचा खोटारडेपणा यापुढे प्रसारमाध्यमांनीही दाखवू नये, असेही ते म्हणाले.
अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पक्षात उभारी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात केलेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी 5 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला सत्ता कशी मिळवावी, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. काहीही करून महाराष्ट्रात महायुती सत्ता मिळवणारच, त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांमध्ये उभारी आली असून, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आता कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बदलापूर प्रकरणातील संस्थाचालकांची पाठराखण : बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे संस्थाचालक अद्यापही फरार असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न विचारताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कुठलाही संबंध नाही. मात्र एखाद्या व्यक्तीने कृत्य केले म्हणून त्याला शाळा किंवा संस्थाचालक पूर्णतः जबाबदार असू शकत नाही. असे सांगून संस्था चालकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचाः