छत्रपती संभाजीनगर No Electricity In 700 ZP School : बदलापूर घटनेनंतर सर्व शाळांमधे तातडीनं सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले आहेत. मात्र वीजच नाही, तर आदेश पाळणार कसे, असा प्रश्न जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांनी उपस्थितीत केलाय. शाळेसाठी वापरलेल्या विजेचं देयक अदा करण्यासाठी उपाययोजना नाही, त्यामुळे डिजिटल शाळा सुरू ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील 182 शाळांमध्ये वीज जोडणी नाही, तर 522 शाळांचं विजेचं देयक न दिल्यानं वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे शाळेच्या विजेचं देयक कायम देता यावं, यासाठी तरतूद केली पाहिजे, अशी मागणी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय साळकर यांनी केली आहे.
शाळांना सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना : बदलापूर इथल्या शाळेत झालेल्या घटनेनंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. शालेय सुरक्षा चांगली करण्यासाठी उपाययोजना करण्याचे शासनानं निर्देशित केले होते. मात्र या घटनेनंतर सर्व शाळांनी एका महिन्याच्या आत शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश जारी करण्यात आले. केलेल्या सूचना आणि तरतुदीचं पालन न केल्यास शाळांचं अनुदान रोखणं किंवा मान्यता रद्द करणं अशा कारवाया केल्या जातील, असा इशारा शालेय शिक्षण विभागानं दिला आहे. तसे स्वतंत्र आदेश शिक्षण आणि क्रीडा विभागानं सर्व शाळांसाठी काढले आहेत. शालेय परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी ते लावणं बंधनकारक करण्यात आलं आहेत. त्यासाठी तातडीनं निधी उपलब्ध करावा आणि या उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील 700 शाळांना नाही वीज : जिल्ह्यातील सर्वच शाळांमधे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना असताना जिल्ह्यात 4454 शाळा असून त्यापैकी जवळपास 2150 शाळांमधे सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत. तर जिल्हा परिषदेच्या 700 शाळांमधे वीज नाही, तर कॅमेरे सुरू करणार कसे, असा प्रश्न शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी केलाय. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था अद्याप चांगली नाही. 182 शाळांमध्ये वीज जोडणी नाही तर 522 शाळांची वीज देयक न दिल्यानं वीज खंडित करण्यात आली आहे. सीसीटीव्ही महत्वाचे आहेत, मात्र वीज नाही तर ते कसे बसवायचे? डिजिटल शिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र वीज नसल्यानं ते देखील शक्य नाही. जिल्हा परिषद शाळेच्या विजेचं देयक देण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना केल्याशिवाय हे कसं शक्य होईल, असा प्रश्न विजय साळकर यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा :